गडचिरोली : स्वातंत्र्याचा 78 वा वर्धापन दिन साजरा करताना राज्यात ‘हर घर तिरंगा’ अभियान तीन टप्प्यांमध्ये साजरे करण्यात येत आहे. या अभियानातील पहिला टप्पा (दि.2 ते 8 ऑगस्ट) झाला असून आजपासून दुसरा टप्पा (दि.9 ते 12 ऑगस्ट) सुरू होत आहे. प्रत्येक नागरिकाने तीनही टप्प्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

पहिल्या टप्प्यात स्वयंसेवकांची नोंदणी, शाळा स्तरावर जनजागृती उपक्रम, लोकसहभाग वाढविणे आणि सर्वत्र तिरंगामय वातावरण निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. तसेच शाळांमधून देशभक्तीपर कार्यक्रम, तिरंग्याचे महत्त्व सांगणाऱ्या कार्यशाळा, प्रभातफेरी, पोस्टर प्रदर्शन यांचेही आयोजन अनेक ठिकाणी केले होते.
दुसरा टप्प्यात नागरिकांमध्ये देशभक्तीचा उत्साह निर्माण होईल, असे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यामध्ये नागरिकांना एकत्रित आणणे, तिरंग्याच्या विक्रीसाठी केंद्र स्थापन करणे, तिरंगा सेल्फी अपलोड मोहिम, सोशल मीडियावर जनसंपर्क वाढविणे, स्पॉटलाइट आणि प्रचार साहित्य तयार करणे यांचा समावेश आहे.
तिसरा टप्प्यात (दि.13 ते 15 ऑगस्ट) प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकावणे, शासनाच्या सर्व कार्यालयांनी सक्रिय सहभाग नोंदविणे आणि अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. सार्वजनिक इमारती, शाळा, व्यापारी संकुले तसेच खासगी घरांवरही ध्वज फडकविण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी पंडा यांनी हर घर तिरंगा अभियान हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असून प्रत्येक नागरिकाने यात सहभागी होऊन देशभक्तीची भावना सादर करण्याचे व सर्वांनी मिळून हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने या अभियानासाठी विविध समित्या, स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालये आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांना सहभागी करून घेण्यात आले असल्याचे उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी कळविले आहे.