गडचिरोली : राज्याचे अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) छेरिंग दोरजे हे शुक्रवारी (दि.8) गडचिरोलीच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या या भेटीदरम्यान गडचिरोली पोलीस दलाच्या दादालोरा खिडकीअंतर्गत एकलव्य हॉल येथे आयोजित कार्यक्रमात अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधव व शालेय विद्यार्थ्यांना विविध साहित्यांचे वितरण करण्यात आले. याशिवाय त्यांच्या हस्ते मुख्यालातील व्हॅालिबॅाल आणि बास्केटबॅाल मैदानाचे भूमिपूजन करण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी अतिदुर्गम भागातील विविध ठिकाणाहून 300 नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमात आदिवासी बांधवांना 5 शिलाई मशिन, 10 धूरमुक्त चुली, 10 स्प्रेपंप तसेच टू-व्हिलरचे प्रशिक्षण घेतलेल्या 28 प्रशिक्षणार्थ्यांना टू-व्हिलर रिपेअर किट आणि 61 शालेय विद्यार्थ्यांना सायकल इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच सन 2024 साली दुर्गम भागातील एकूण 23,935 विद्यार्थ्यांनी वीर बाबूराव शेडमाके सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेमधील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी अपर पोलीस महासंचालक दोरजे यांनी उपस्थितांना संबोधित करताना, ‘पोलीस आणि नागरिकांच्या समन्वयामुळे गडचिरोली जिल्ह्रातील माओवाद कमी झाल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणावर सर्वाधिक लक्ष केंद्रीत करत मेहनत घ्यावी, तसेच आपण ग्रामीण भागात राहात असल्याबाबत मनात कमीपणा न बाळगता उच्च शिक्षण आणि चांगल्या भविष्यासाठी नेहमी प्रयत्नशिल राहावे. पोलीस दल नेहमीच नागरिकांच्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगिन विकासासाठी कटिबद्द आहे.’, असे सांगितले.
आतापर्यंत 13,997 युवक-युवतींना प्रशिक्षण
गडचिरोली जिल्ह्रातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतीना उच्च दर्जाचे व्यावसायिक व कौशल्य प्रशिक्षण मिळवून देण्यासाठी ‘पोलीस दादालोरा खिडकी’ अंतर्गत ‘प्रोजेक्ट उडान’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यात शिक्षण, आरोग्य, कृषी, कौशल्य विकास, क्रीडा व संस्कृती या विविध क्षेत्रांत नागरिकांच्या सर्वांगिण विकासासाठी गडचिरोली पोलीस दल कार्यरत आहे. पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आजपावेतो 13,997 युवक-युवतींना रोजगार स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण, 737 शेतकयांना कृषी सहलींचा लाभ, 1240 नागरिकांची डोळ्यांची शस्त्रक्रिया, यासोबतच दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी 71 सार्वजनिक वाचनालये, अशा प्रकारचे विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. तसेच 3,578 विद्यार्थ्यांना स्किलिंग इन्स्टिट्युटच्या माध्यमातून सॉफ्टवेअर डेवलपर व वेब डेवलपर इ. प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आजपावेतो एकूण 10,73,905 नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे.
मैदानाच्या कामाचा शुभारंभ
पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांना कर्तव्यासोबतच आपले शारीरिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) छेरिंग दोरजे यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पोलीस कवायत मैदानात व्हॉलीबॉल व बास्केटबॉल मैदानाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. याप्रसंगी पोलीस उपमहानिरीक्षक (गडचिरोली परिक्षेत्र) अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्राणहिता) सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी, तसेच सहायक पोलीस अधीक्षक (धानोरा) अनिकेत हिरडे व पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमांसाठी नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. चंद्रकांत शेळके व सर्व अंमलदार, तसेच पोलीस मुख्यालयाच्या अधिकारी व अंमलदारांनी परिश्रम घेतले.