आरमोरी : येथील मुख्य मार्गावरच्या भगतसिंग चौकातीत हिरो कंपनीच्या दुचाकी शोरूमच्या इमारतीची जीर्ण झालेली मागील बाजुची भिंत शुक्रवारी संध्याकाळी कोसळली. त्याखाली दबून तीन युवकांना हकनाक जीव गमवावा लागला. याशिवाय तिघे जण जखमी झाले. नगर पंचायतने ती इमारत जीर्ण झाल्याचे सांगत इमारतीचा वापर बंद करण्याची नोटीस आधीच दिलेली होती. तरीही इमारतीच्या मालकाने त्या इमारतीत आपले शो-रूम सुरूच ठेवले होते, अशी माहिती तहसीलदार उषा चौधरी यांनी दिली.

या दुर्घटनेत आकाश ज्ञानेश्वर बुरांडे (33 वर्ष) रा.निलज, ता.ब्रम्हपुरी, तहसीम इस्राईल शेख (28 वर्ष) रा.वडसा, आणि मोहम्मद हसनअली शेख (32 वर्ष) रा.वडसा हे तिघे मलब्याखाली दबून जागीच मृत्यूमुखी पडले. तर दीपक अशोक मेश्राम रा.आरमोरी, विलास कवडू मने रा.आरमोरी आणि सौरभ रवींद्र चौधरी रा.मेंढकी ता.ब्रम्हपुरी जि.चंद्रपूर हे जखमी झाले आहेत. त्यातील दोघांना पुढील उपचारासाठी गडचिरोलीला हलविले, तर एकावर आरमोरीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दुर्घटनाग्रस्त इमारत अज्जूभाई लालानी यांच्या कार्यकाळातील आहे. सध्या त्या इमारतीत त्यांचे चिरंजीव सद्रू लालानी यांनी हिरो शोरूम थाटले आहे. त्याच शोरूमच्या मागील बाजुची भिंत कोसळून हा अपघात झाला. ज्या बाजुची भिंत कोसळली, त्या भागात शो-रूमचे सर्व्हिस सेंटर आहे. त्यामुळे त्या ठिकाणी बाहेर काही दुचाकीसुद्धा ठेवलेल्या होत्या. तिथे काम सुरू असताना अचानक मागील बाजुचा स्लॅबचा काही भाग आणि त्यालाच्या आधाराने असलेली भिंत कोसळली. त्यामुळे तिथेच काम करत असलेला मेकॅनिक, एक दलाल आणि आणखी एक व्यक्ती असे तिघे मलब्याखाली दबल्या जाऊन त्यांचा मृत्यू झाला. जेसीबीच्या सहाय्याने मलबा बाजुला करून तिघांना जीवंत बाहेर काढण्यात आले.
गुन्हा दाखल करण्याचे तहसीलदारांचे निर्देश
या घटनेनंतर तहसीलदार उषा चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. सध्या आरमोरी नगर पंचायतच्या मुख्याधिकाऱ्याचा प्रभार धानोराचे मुख्याधिकारी प्रितीश मगरे यांच्याकडे आहे. नगर पंचायत प्रशासनाने सदर इमारत जीर्ण झाल्याचे सांगत त्याचा वापर बंद करावा आणि ती इमारत पाडावी, अशी नोटीस इमारत मालक लालानी यांना दिली होती. विशेष म्हणजे इमारत मालकाने नव्याने इमारत बांधण्यासाठी जवळपास वर्षभरापूर्वी नगर पंचायतकडे परवानगीही मागितली होती. मात्र परवानगी घेतल्यानंतरही प्रत्यक्ष इमारतीचे बांधकाम मात्र सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे या घटनेसाठी जबाबदार करून इमारत मालकावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश तहसीलदारांनी दिले. यासंदर्भातील केलेल्या कारवाईबद्दल जाणून घेण्यासाठी पोलीस निरीक्षक कैलास गवते यांना अनेक वेळा फोन केला, पण फोन आणि मॅसेजला त्यांनी रात्री 10 वाजेपर्यंत कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे दोषींना वाचवण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र जिल्हा पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे रात्री उशिरा कळविले.
बेजबाबदार लोकांवर गुन्हे दाखल करा
इमारत मोडकळीस आल्यानंतरही इमारत मालक आणि नगर परिषद प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आणि निष्पाप लोकांचा बळी गेला, त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते रामदास जराते, श्यामसुंदर उराडे, जयश्री जराते, आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, धर्मानंद मेश्राम, विनोद मडावी यांनी केली आहे.