तत्पर सेवेसाठी तुमनूरमध्ये उभारणार आरोग्य उपकेंद्र

धर्मरावबाबांनी केले भूमिपूजन

सिरोंचा : ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना तत्परतेने आरोग्य सेवा मिळावी यासाठी माजी मंत्री तथा आमदार डॅा.धर्मरावबाबा आत्राम यांनी पुढाकार घेतला आहे. त्यातूनच सिरोंचा तालुक्यातील तुमनूर येथे आरोग्य उपकेंद्राची उभारणी केली जाणार आहे. या कामाचे भूमिपूजन धर्मरावबाबांच्या हस्ते संपन्न झाले. यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सेवेसाठी लांबचा प्रवास करण्याची गरज पडणार नाही आणि गावातच सरकारी आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे.

सिरोंचा तालुका मुख्यालयापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या तुमनूर गावात हा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमस्थळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्य उपकेंद्रामुळे भविष्यात लहान-मोठ्या आजारांचे प्राथमिक उपचार, लसीकरण, गर्भवती माता व बालकांची आरोग्य तपासणी यांसारख्या सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होतील.

या भूमिपूजन सोहळ्यास तुमनूरच्या सरपंच पद्मा राजन्ना सिडाम, उपसरपंच बबिता किरण वेमुला, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लुरी, नगरसेवक सतीश राचर्लावार, नगरसेवक जगदीश रालाबंडीवार, कार्यकारी अध्यक्ष मदनया मादेशी, शहर अध्यक्ष रवी सुलतान, ओमप्रकाश ताटीकोंडावार, रामकिष्ट रामया निलम (जिल्हा उपाध्यक्ष), व्यंकटेश दुर्गम, रमेश पोटयाला, माजी उपसरपंच किरण वेमुला, राजू ताटी, नागेश गुरूसिंगला, अभियंता वाय.आर.मसे तसेच ग्रामस्थ व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या मनोगतात आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले की, तुमनूरसह तालुक्यातील दुर्गम गावांमध्ये आरोग्य सुविधा पोहोचविणे हे माझ्या प्राधान्यक्रमात आहे. आज या भूमिपूजनाने तुमनूरला आरोग्याचा नवा श्वास मिळाला आहे. बांधकाम लवकर पूर्ण करून नागरिकांच्या सेवेसाठी हे उपकेंद्र कार्यरत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे संचालन नागभूषण चकिनारपुवार यांनी केले. उपस्थित नागरिकांनी गावाच्या आरोग्य उन्नतीसाठी एकत्रितपणे कार्य करण्याचे आश्वासन दिले. भूमिपूजनानंतर गावात आनंदोत्सवाचे वातावरण पसरले.