अपघातग्रस्त मुलांच्या कुटुंबियांचे वडेट्टीवार यांच्याकडून सांत्वन

खा.किरसान व पदाधिकारीही हजर

गडचिरोली : गेल्या आठवड्यात काटली या गावाजवळ चार शाळकरी मुलांना एका भरधाव ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्या मुलांना जीव गमवावा लागला होता. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आणि लोकलेखा समितीचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार, तसेच खासदार डॅा.नामदेव किरसान यांनी काटली गावाला भेट देऊन मृत मुलांच्या पालकांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला.

या अपघातात तन्वीर मानकर, टिंकू भोयर, दुशान्त मेश्राम व तुषार मारबते या चार विद्यार्थ्यांचा मृत्यू, तर आदित्य कोहपरे व क्षितिज मेश्राम हे दोघे गंभीर जखमी झाले.

या सांत्वनपर भेटीप्रसंगी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, अ.भा. युवक काँग्रेसचे सचिव विश्वजित कोवासे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष सतीश विधाते, गौरव येनप्रेडीवार यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्यासमक्ष वडेट्टीवार यांनी पोलीस अधीक्षकांशी मोबाईलवर संपर्क करून या घटनेचा जलदगतीने तपास करण्यासोबत नुकसानभरपाई मिळवून देण्याबाबत सूचना केल्या.