मुलचेरा तालुक्यातील गावांमध्ये डेंग्युचे 66 रुग्ण, तिघांचा मृत्यू

डीएचओंची भेट, उपाययोजना सुरू

धूरफवारणीची पाहणी करताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा.प्रताप शिंदे व इतर अधिकारी.

मुलचेरा : तालुक्यातील आणि विशेषत: लगाम प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत काही गावांमध्ये गेल्या आठवडाभरापासून तापाने थैमान घातले आहे. यात सोमवारी (दि.11) एका महिलेचा उपचारादरम्यान चंद्रपूर येथे मृत्यू झाल्याने आठवडाभरात मृतांची संख्या तीन झाली आहे. तो ताप डेंग्युचा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आतापर्यंत एक हजारावर रुग्णांचे रक्तनमुने तपासण्यात आले. त्यात 66 जण डेंग्युग्रस्त आढळले आहेत. त्यात 14 वर्षाच्या आतील 12 बालकांचा समावेश आहे.

दरम्यान जिल्हा आरोग्य आरोग्य अधिकारी डॅा.प्रताप शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी डेंग्यू नियंत्रणासाठी धुरफवारणीसह विविध उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.पंकज हेमके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विनोद मशाखेत्री, साथरोग अधिकारी डॉ.रुपेश पेंदाम प्रामुख्याने उपस्थित होते.

लगाम प्राथमिक आरोग्य केंद्रांअंतर्गत येत असलेल्या काही गावांत तापाचे रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य विभागाने 7 ऑगस्टपासून रुग्ण तपासणी मोहीम सुरू केली. पण रुग्णसंख्या वाढतच असल्याने तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात वेगवेगळ्या चमूंनी आरोग्य तपासणीचे काम सुरू केले. 10 ऑगस्टपर्यंत 236 जणांची डेंग्यूची चाचणी करण्यात आली, त्यातील 66 रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळले. सर्वाधिक 41 रुग्ण येल्ला या एकाच गावात आढळले. याशिवाय लगाम 13, काकरगट्टा 3, गितली 1, मच्छीगट्टा 2, टिकेपल्ली 4, शांतिग्राम येथे 2 रुग्ण आढळले आहेत. 25 रुग्णांना लगाम प्राथमिक आरोग्य केंद्रातून अहेरी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. विशेष म्हणजे 10 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी 19 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

मागील 10 दिवसात 1 हजार 65 रुग्णांची आरोग्य तपासणी झाली आहे. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांसह अडपल्ली, सुंदरनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक आदी कर्मचारी याठिकाणी ठाण मांडून आहेत. तीन जण दगावल्यानंतर गावात भीतीचे वातावरण असून रुग्ण स्वतः रुग्णालयात जाऊन रक्त तपासणी करून घेत आहेत, असे येल्लाचे उपसरपंच दिवाकर उराडे यांनी सांगितले.

विविध उपाययोजना सुरू

जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा.शिंदे यांनी भेट दिल्यानंतर त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना विविध सूचना केल्या. दैनंदिन कंटेनर, मास सर्व्हे, कोरडा दिवस, रक्तनमुने संकलन याबाबत आरोग्य यंत्रणेला मार्गदर्शन केले. लगाम प्रा.आ.केंद्रातील आंतररुग्ण विभागातील रुग्णांची भेट घेतली. येल्ला गावातील साथ आटोक्यात येईपर्यंत रुग्णवाहिका व आरोग्य पथक सतत तैनात ठेवण्यासाठीही त्यांनी सूचना दिल्या. तसेच कीटकजन्य व जलजन्य आजाराचा एकजरी रुग्ण आढळला तरी तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याबाबतचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी दिले आहेत.

नागरिकांनी ही काळजी घ्यावी

– दर आठवड्याला घरातील पाण्याची भांडी रिकामी करून आतून स्वच्छ घासून पुसून घ्यावी.

– रिकामे न करता येणाऱ्या भांड्यामध्ये दर आठवड्याला आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत अळीनाशक द्रावण (टेमिफॉस) टाकावे.

– घरावरील तसेच घरातील पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकण लावावे.

– जुने टायर्स, नारळाच्या करवंट्या, पाणी साचू शकेल अशा फुटलेल्या बाटल्या, प्लास्टिकच्या वस्तू अशा निरुपयोगी वस्तू घराभोवती साठू देऊ नका.

– घरातील फुलदाण्या, कुलर्स, फ्रिज यामध्ये साचलेले पाणी दर दोन-तीन दिवसांनी काढा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.