मुख्यमंत्री सहायता निधीची मदत घेण्यात गडचिरोली माघारला

7 महिन्यात अवघे 9 लाभार्थी

गडचिरोली : आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष मोठा आधार बनला असताना गडचिरोली जिल्ह्यात मात्र त्याचा लाभ घेण्याचे प्रमाण फारच कमी आहे. एकीकडे नागपूर विभागातल्या 6 जिल्ह्यांनी मागील 7 महिन्यांत (जानेवारी ते जुलै) तब्बल 1582 रुग्णांना 13 कोटी 81 लाख 20 हजार रुपयांची वैद्यकीय मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून करण्यात आली आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात याचा लाभ केवळ 9 रुग्णांनी घेतला असून त्यांना 9 लाखांची मदत करण्यात आली आहे. माहितीची अभाव हे त्यामागील प्रमुख कारण असण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार पेपरलेस आणि डिजीटल प्रणालीद्वारे प्रत्येक जिल्हास्तरावर जिल्हा कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचा लाभ घेण्यासाठी मंत्रालयात येण्याची गरज नाही. रुग्णांनी प्रथम महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम किंवा धर्मादाय रुग्णालयांच्या योजनांचा लाभ घ्यावा. जर या योजनांद्वारे उपचार शक्य नसतील, तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकडे संलग्न असणाऱ्या रुग्णालयातून अर्ज करता येतो. यामुळे शासकीय योजनांचा वापर होतो आणि निधी खऱ्या गरजू रुग्णांपर्यंत पोहोचतो. परंतू गडचिरोली जिल्ह्यात यासंदर्भात बहुतांश नागरिक अनभिज्ञ असल्यामुळे लाभ घेण्याचे प्रमाण सर्वात कमी आहे.

अशी आहे नागपूर विभागातील जिल्हानिहाय मदत
(1 जानेवारी ते 31 जुलै 2025)

नागपूर जिल्ह्यात 1396 रुग्णांना 12 कोटी 16 लाख 82 हजार रुपये, वर्धा जिल्ह्यात 41 रुग्णांना 39 लाख 55 हजार रुपये, भंडारा जिल्ह्यात 31 रुग्णांना 29 लाख 35 हजार रुपये, गोंदिया जिल्ह्यात 50 रुग्णांना 39 लाख रुपये, चंद्रपूर जिल्ह्यात 54 रुग्णांना 47 लाख 48 हजार रुपये, तर गडचिरोली जिल्ह्यात जेमतेम 9 रुग्णांना 9 लाखांची मदत मिळाली आहे.

या 20 गंभीर आजारांसाठी मिळते मदत

* कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्षे 2 ते 6)

* हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो प्रत्यारोपण

* कर्करोग (शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन)

* रस्ते अपघात

* बालकांच्या शस्त्रक्रिया

* हिप व गुडघा रिप्लेसमेंट

* मेंदूचे आजार, डायालिसिस, अस्थिबंधन

* बर्न/विद्युत अपघातग्रस्त रुग्ण

* नवजात शिशुंचे आजार इ.

कोणत्या कागदपत्रांची असते गरज?

* रुग्णाचे आधार कार्ड व रेशन कार्ड

* रुग्ण दाखल असल्यास जिओ टॅग फोटो (अनिवार्य)

* तहसीलचा उत्पन्नाचा दाखला (1.60 लाखांपेक्षा कमी)

* वैद्यकीय रिपोर्ट व खर्चाचे प्रमाणपत्र

* एफआयआर (अपघातग्रस्तांसाठी)

* झेडटीसीसी पावती (अवयव प्रत्यारोपणासाठी)

अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक : 9321 103 103 असा आहे.