गडचिरोली : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीपर वातावरण निर्मितीसह “हर घर तिरंगा” मोहिमेचा भाग म्हणून जिल्ह्यात अनेक ठिकाणी तिरंगा रॅली काढण्यात आल्या. यात धानोरा येथे विद्यार्थ्यांनी काढलेली 90 मीटर लांब तिरंगा यात्रा आकर्षण ठरली. याशिवाय गोंडवाना विद्यापीठातील आदर्श पदवी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तिरंगा रॅलीतून घरोघरी तिरंगा फडकविण्यासोबत त्याचा योग्य सन्मान राखण्याबद्दल जनजागृती केली. इंदिरा गांधी चौकातून तिरंगा सायकल रॅलीही काढण्यात आली.
आदर्श महाविद्यालयाची ‘हर घर तिरंगा’ रॅली
राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय यांच्या निर्देशानुसार गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत आदर्श पदवी महाविद्यालयाच्या वतीने विद्यापीठ परिसरातून बुधवारी (दि.13) “हर घर तिरंगा” रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी ‘भारत माता की जय’, ‘हर घर तिरंगा… घर घर तिरंगा’ अशा जोशपूर्ण घोषणा देत परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून टाकला. प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकविण्याचे आवाहन करत, राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
रॅली विद्यापीठ परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा सत्र न्यायालय या मार्गाने मार्गक्रमण करत पुन्हा विद्यापीठात आली. याप्रसंगी प्राचार्य डॉ.श्याम खंडारे, कार्यक्रम अधिकारी प्रा.अंतबोध बोरकर, प्रा.मनिषा पिपरे, सुदर्शन जानकी, प्रा.प्रणिता चंदनखेडे, प्रा.अजय राठोड, प्रा.नितीन चौधरी, प्रा.ऋतिक कोहळे, प्रा.मंगेश कडते, प्रा.पंकज राऊत, प्रा.मनोज बिरहारी, प्रवीण गिरडकर यांच्यासह कर्मचारीवृंद व विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. या रॅलीत तरुणाईचा जोश, राष्ट्रप्रेमाचा संदेश आणि तिरंग्याची शान यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला.
रिमझिम पावसात तिरंगा सायकल यात्रा
प्रदूषणमुक्त भारताचा संदेश आणि देशभक्तीचा हेतू घेऊन सायकलस्नेही मंडळ, गडचिरोली यांच्या वतीने मंगळवारी (दि.12) रिमझिम पावसात “तिरंगा सायकल यात्रा” काढण्यात आली. या यात्रेमुळे शहर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले. यात्रेचा शुभारंभ इंदिरा चौकात नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी जयवंत काटकर यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आला. ही रॅली मूल मार्गाने निघून आठवडी बाजार, कारगिल चौक, विश्रामगृह आणि पुन्हा इंदिरा गांधी चौक अशी एक तास चालली. या उपक्रमाचे मुख्य आयोजक सायकलस्नेही मंडळाचे उदय धकाते होते.
या उपक्रमात वसंत विद्यालय, महिला महाविद्यालय, विद्याभारती कन्या हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, फुले-आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, राणी दुर्गावती कन्या हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय अशा विविध शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षक-शिक्षिका तसेच नागरिक सहभागी झाले होते. याशिवाय इतरही सायकलप्रेमींनी सहभागी होऊन उत्साह वाढवला.
समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण होते. आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की, “तिरंगा सायकल रॅलीने शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण केले आहे. मी स्वतः दररोज सकाळी व रात्री शहरात सायकलवरून गस्त घालून कायदा व सुव्यवस्थेची पाहणी करतो. भविष्यात प्रत्येक शाळेत वाहतूक नियम व शिस्तीबाबत जनजागृतीसाठी पोलीस विभाग पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन विजय साळवे यांनी केले.
तिरंगा विक्री व वितरण उपक्रमाला प्रतिसाद
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत केंद्र शासनाने सन 2022 पासून सुरू केलेल्या “हर घर तिरंगा” मोहिमेत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळावा यासाठी नगर परिषद गडचिरोलीतर्फे तिरंगा विक्री व वितरण उपक्रम सुरू आहे. नगर परिषदेने त्यासाठी 6 हजार झेंडे उपलब्ध करून दिले आहे. राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियानांतर्गत तेजस्वी शहर उपजीविका केंद्रामार्फत गाळा क्र.26, 27, आठवडी बाजार व कारगिल चौक येथे नागरिकांना झेंड्यांचे वितरण केले जात आहे. याशिवाय नगर परिषद कार्यालयात, तसेच राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियानअंतर्गत नोंदणीकृत बचत गटांच्या माध्यमातूनही झेंड्यांचे वितरण सुरू आहे. नगर परिषदेतर्फे घरोघरी ध्वज वितरणाची विशेष मोहीम देखील राबविण्यात येत आहे. “हर घर तिरंगा” मोहिमेत सहभागी होऊन आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवून देशभक्तीची भावना जागवावी, तसेच राष्ट्रीय ऐक्य व अभिमानाचे प्रतीक असलेल्या या उपक्रमाला यशस्वी करावे, असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांनी केले आहे.