गडचिरोली : मंगळवारी रात्रीपासून बुधवारच्या सकाळपर्यंत जिल्ह्याच्या दक्षिण भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर येऊन अनेकांची धांदल झाली. मुलचेरा, एटापल्ली, चामोर्शी तालुक्यात बुधवारी दिवसभर तीन मार्ग बंद असल्याने विद्यार्थ्यांसह बस प्रवाशांना याचा फटका बसला. पण पावसाने विश्रांती घेतल्याने संध्याकाळपर्यंत दोन मार्ग सुरू झाले होते.
बुधवारी सकाळी दिना नदी आणि चाची नाल्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने कोपरअली ते मुलचेरा हा राज्यमार्ग बंद झाला. तसेच हेटलकसा-बोलेपल्ली-एटापल्ली हा राज्यमार्ग आणि भेंडाळा-गणपूर बोरी हा प्रमुख जिल्हा मार्ग हळदीमाल नाल्याच्या पुरामुळे बंद झाला होता. पण संध्याकाळपर्यंत हेटलकसा ते एटापल्ली मार्ग वगळता इतर दोन मार्ग सुरू झाले होते.
दरम्यान सकाळी विद्यार्थ्यांना शाळेत नेण्यासाठी मुक्कामी असलेल्या मानव विकास मिशनच्या बसगाड्यांसह इतर प्रवाश्यांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसेस मार्ग बंद असल्याने अडून पडला. त्यामुळे मुलचेरा तालुक्याचा संपर्क बराच वेळ तुटलेला होता.