सहपालकमंत्र्यांच्या हस्ते उद्या होणार मुख्य ध्वजारोहण सोहळा

आज नियोजन समितीची बैठक

गडचिरोली : यावर्षी 15 ऑगस्टला 79 व्या स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. यावेळी राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. त्यासाठी आजच (दि.14) दुपारी सहपालकमंत्री गडचिरोलीत दाखल होत आहे. त्यांच्या उपस्थितीत आज विविध कार्यक्रमांसह जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे.

असा आहे सहपालकमंत्र्यांचा दौरा

सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल आज, दि.14 ला रोजी दुपारी 2 वाजता सोनापूरच्या शासकीय फळ रोपवाटीकेतील कृषी चिकित्सालयात आयोजित जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवास उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 2.30 वाजता गडचिरोली नगर परिषदेत इंटरअॅक्टिव्ह पॅनलच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात जिल्हा नियोजन समितीच्या सभेला उपस्थित राहतील. सायंकाळी 6 वाजता त्यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर शासकीय विश्रामगृहात त्यांचा वेळ राखीव राहील.

शुक्रवार, दि.15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास उपस्थित राहून सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे येऊन सोयीनुसार रामटेककडे प्रयाण करतील.

कृषी विज्ञान केंद्रात रानभाजी महोत्सव

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) द्वारे आज, दि.14 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता कृषी चिकित्सालय सोनपूर, गडचिरोली येथे रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार डॉ.नामदेव किरसान, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आ.डॉ.मिलिंद नरोटे, आ.रामदास मसराम, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.किशोर झाडे, कृषी महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ.माया राऊत उपस्थित राहणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माच्या प्रकल्प संचालक प्रीती हिरळकर यांनी कळविले.