गडचिरोली : नगर परिषदेच्या 10 शाळांमध्ये प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेतून अत्याधुनिक डिजिटल सुविधा बसवून त्या शाळांना पूर्णपणे डिजिटल बनविण्यात आले. सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते या सुविधांचे लोकार्पण करण्यात आले. यात इंटरॲक्टिव पॅनल, बालभारतीद्वारे मान्यताप्राप्त सॉफ्टवेअर यासह इतर सुविधांचा समावेश आहे.
यावेळी ना.जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत ‘आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि उपलब्ध साहित्याचा प्रभावी वापर करून गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन उच्च ध्येय गाठा’ असे आवाहन केले.
या उपक्रमांतर्गत शाळांना 65 इंची अँटीग्लेअर 4-के यूएचडी टच इंटरअॅक्टिव्ह पॅनल, बालभारती मान्यताप्राप्त ई-लर्निंग सॉफ्टवेअर, शुद्ध पाण्यासाठी आरओ प्रणाली, थंड पाण्याचा वॉटर कूलर, पोर्टेबल पीए सिस्टीम, इंटेल कोअर आय-3 प्रोसेसरसह डेस्कटॉप संगणक संच, युपीएस, वाय-फाय राऊटर, मल्टीफंक्शन लेझर प्रिंटर, तसेच संगणक टेबल व खुर्च्या पुरविण्यात आल्या आहेत.
शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदलाची अपेक्षा
या प्रकल्पामुळे नगर परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना डिजिटल युगाशी सुसंगत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार असून, शैक्षणिक वातावरणात आमूलाग्र बदल होईल, असा विश्वास सहपालकमंत्री जयस्वाल यांनी व्यक्त केला. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून तंत्रज्ञानाचा सर्जनशील व शैक्षणिक प्रगतीसाठी उपयोग करण्याबद्दल मार्गदर्शन केले.
लोकार्पण कार्यक्रम पंडित जवाहरलाल नेहरू नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा, रामनगर येथे पार पडला. यावेळी खासदार डॉ.नामदेव किरसान, आमदार डॉ.मिलींद नरोटे, मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर, मुख्याध्यापक सुधीर गोहणे, संगणक अभियंता चंद्रशेखर भगत, शिक्षक-कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.