मुलचेरा : मुलचेरा तालुक्यात गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या डेंग्युच्या उद्रेकाने आतापर्यंत चार जणांचा बळी घेतला आहे. याशिवाय 100 पेक्षा जास्त जणांना डेंग्युने ग्रासले आहे. यातील बहुतांश रुग्ण हे लगाम प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतील आहेत. दरम्यान यासाठी जबाबदार धरून लगामचे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॅा.ओंकार कोल्हे यांना सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले, तर आरोग्य सहायक लिंगाजी नैताम आणि अशोक डोंगरवार यांना निलंबित करण्यात आले.
दरम्यान एवढे गंभीर प्रकरण झाल्यानंतर तालुका आरोग्य अधिकाऱ्याकडे जिल्हा मलेरिया अधिकाऱ्याचा प्रभार दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यासंदर्भात सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी चौकशीचे आदेश दिले आहे.
लगाम प्रा.आ.केंद्राअंतर्गत येल्ला गावात डेंग्युचा प्रकोप सर्वाधिक झाला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा.प्रताप शिंदे यांनी डेंग्युग्रस्त भागात भेट दिली. त्यानंतर गावात डासनाशक फवारणीसह नागरिकांनी काय काळजी घ्यावी यासाठी आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्यामुळे डेंग्युला आता आवर बसेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.