

गडचिरोली : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शुक्रवारी पोलीस दलाच्या पुढाकाराने दुर्गम भागात अनेक ठिकाणी झेंडावंदन करण्यात आले. विशेष म्हणजे कधीकाळी जे तिरंगा फडकविण्यास विरोध करत होते त्यांच्याच हस्ते यावर्षी तिरंगा झेंडा फडकवण्यात आला. या सकारात्मक बदलातून जिल्ह्याच्या बदलत असलेल्या रूपाची झलक दिसून आली. विशेष म्हणजे शहरात पोलीस विभागाच्या वतीने काढलेल्या भव्य तिरंगा बाईक रॅलीत स्वत: पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासह 4 आयपीएस आणि 2 आयएएस अधिकाऱ्यांनी बाईक चालवत लक्ष वेधून घेतले.
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आयोजित भव्य तिरंगा बाईक रॅलीला राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, खा.डॅा.नामदेव किरसान, मा.खा.डॅा.अशोक नेते, आ.डॅा.मिलींद नरोटे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. या रॅलीत पोलीस अधीक्षक नीलोत्पल, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रणजित यादव, अपर पोलीस अधीक्षक एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी आणि सहा.पोलीस अधीक्षक तथा धानोराचे एसडीपीओ अनिकेत हिरडे या आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांनी बाईकवर स्वार होऊन पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविला. या पोलीस अधिकारी आणि अंमलदार मिळून 300 जण सहभागी झाले होते. पोलीस मुख्यालय ते इंदिरा गांधी चौक आणि पुन्हा पोलीस मुख्यालयात पोहोचलेल्या या रॅलीतून कर्तव्य, तत्परता आणि त्यागाचा संदेश देण्यात आला.
राष्ट्रपती पदकप्राप्त कर्मचाऱ्यांचा सत्कार
79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली पोलीस दलातील 7 पोलीस अधिकारी- अंमलदारांना राष्ट्रपतींचे पोलीस शौर्य पदक जाहीर झाल्याबदद्ल त्यांचा प्रशस्तिपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यासोबतच पदोन्नती मिळालेल्या पोलीस अंमलदारांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यानंतर पोलीस अधीक्षकांनी शहिद कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच नवजीवन वसाहत येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान आत्मसमर्पित माओवादी सदस्यांसोबत स्वातंत्र्य दिन साजरा करत आत्मसमर्पित माओवाद्यांच्या कुटुंबांमध्ये मिठाईचे वाटप करण्यात आले.
आत्मसमर्पित माओवाद्यांचा सहभाग
जून 2024 मध्ये माओवाद्यांच्या विभागीय समितीचा प्रभारी डिकेएसझेडसीएम गिरीधर तुमरेटी याने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले होते. शुक्रवारी गिरीधर याने आत्मसमर्पणानंतर पहिल्यांदाच त्याच्या मूळ गावी मौजा जवेली खुर्द येथे भेट देत ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद शाळेत आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात सहभागी होऊन स्वातंत्र्य दिन साजरा केला. माओवादी अतिदुर्गम गावांमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी काळे झेंडे फडकविण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र गडचिरोली पोलीस दलाने त्यांचे मनसुबे उधळून लावत दुर्गम-अतिदुर्गम भागांमध्ये तसेच विविध पोस्टे/ उपपोस्टे/ पोलीस मदत केंद्रात ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात घेतला. भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांनी पोलीस पथकासह अभियान राबवून नारगुंडा हद्दीतील अतिदुर्गम मर्दहूर येथे ध्वजारोहण करून नागरिकांसोबत स्वातंत्र्य दिन साजरा केला.
दुर्गम भागात अनेक ठिकाणी पोलीस दलाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांची रॅली, तसेच अंमली पदार्थविरोधी शपथ, असे विविध कार्यक्रम घेऊन अंमली पदार्थविरोधी जनजागृती करण्यात आली. नव्याने उभारलेल्या नेलगुंडा व कवंडे पोलीस स्टेशनमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रध्वज फडकावून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. पोलीस मुख्यालयात अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला.