डेंग्युग्रस्त येल्ला, काकरगट्टाला आरोग्य उपसंचालकांची भेट

दिल्या साथरोग प्रतिबंधात्मक सूचना

आरोग्यविषयक उपाययोजनांची पाहणी करून सूचना करताना उपसंचालक डॅा.शंभरकर

गडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र लगामअंतर्गत डेंग्युग्रस्त येल्ला, काकरगट्टा या गावांना नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॅा.शशिकांत शंभरकर यांनी भेट देऊन डेंग्यूच्या सद्यस्थितीची पाहणी केली. त्यांनी ग्रामपंचायत येल्लाला भेट देऊन कर्मचारी व अधिकाऱ्यांना साथरोग नियंत्रणाबाबत सूचना दिल्या.

गावांमधील धुरफवारणी, तापरुग्ण कंटेनर सर्व्हेचा आढावा घेतला. तसेच सहाय्यक संचालक (हिवताप) डॉ.नयना धुपारे यांनी लगाम, शांतीग्राम, मरपल्ली या गावांना भेटी दिल्या. गावातील धुरफवारणीला सहकार्य करा, ताप आला की त्वरित रक्त तपासणी करून औषधोपचार घ्या. ताप अंगावर काढू नका. सरकारी रुग्णालयात सर्व सुविधा व उपचार मोफत आहेत, असे आवाहन जि.प.चे मुख्य कार्यकारी सुहास गाडे यांनी केले आहे.

कीटकजन्य आजाराला दूर ठेवण्याचे उपाय

* कीटकजन्य आजाराला नियंत्रित करण्यासाठी दर आठवड्याला घरातील पाण्याची भांडी रिकामी करा व आतून स्वच्छ घासून पुसून कोरडी करा.

* रिकाम्या न करता येणाऱ्या भांड्यामध्ये दर आठवड्याला आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत अळीनाशक द्रावण (टेमीफॉस) टाका.

* घरावरील तसेच घरातील पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकण लावा.

* जुने टायर्स, नारळाच्या करवंट्या, पाणी साचू शकेल अशा फुटलेल्या बाटल्या, प्लास्टिकच्या वस्तू अशा निरुपयोगी वस्तू घराभोवती साठू देऊ नका.

* घरातील फुलदाण्या, कुलर्स, फ्रिज यांमध्ये साचलेले पाणी दर दोन-तीन दिवसांनी काढा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.