डेंग्युच्या तक्रारी व मदतीसाठी आता 24 तास नियंत्रण कक्ष

प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा

गडचिरोली : जिल्ह्याच्या मुलचेरा तालुक्यात गेल्या तीन आठवड्यांत डेंग्युने ग्रस्त 5 जणांचा मृत्यू होण्यासोबत 135 जणांना डेंग्युने ग्रासले आहे. डेंग्युवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभाग विविध उपाययोजना करत आहे. त्यातूनच आता 24 तास नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आला आहे. मात्र नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

आरोग्य पथके घराघरांमध्ये जाऊन डेंग्युसदृश रुग्णांचे सर्व्हेक्षण आणि पाण्याच्या साठ्यांची तपासणी करत आहेत. डासांची उत्पत्ती थांबावी यासाठी प्रतिबंधक फवारणी केली जात आहे. डेंग्यूपासून बचाव कसा करावा याबाबत नागरिकांना माहिती दिली जात आहे. ऑडिओ संदेश, मायकिंग आणि सोशल मीडियाद्वारे माहिती पोहोचवली जात आहे. डेंग्यूच्या रुग्णांसाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. आवश्यक औषधे, बेड आणि डॉक्टरांची टीम उपचार करत आहे. डेंग्यूचा उद्रेक झालेल्या गावात आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. एवढेच नाही तर डेंग्यूच्या तक्रारी आणि मदतीसाठी 24 तास कार्यरत राहील असा नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. नागरिक त्या नियंत्रण कक्षासोबत 7132222030 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

डेंग्यूच्या या परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि स्वच्छतेवर भर द्यावा. या उपाययोजनांमुळे डेंग्यूच्या प्रादुर्भावावर लवकरच नियंत्रण मिळवता येईल, असा विश्वास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी व्यक्त केला.

डेंग्यु टाळण्यासाठी नागरिकांनी हे करावे

पाणी साचू देऊ नका : आपल्या घराच्या परिसरात, गच्चीवर, कुंड्यांमध्ये, टायरमध्ये किंवा इतरत्र पाणी साचू देऊ नका.

पाणी बदला : कूलर, फुलदाण्या आणि पाण्याच्या भांड्यांमधील पाणी नियमितपणे बदला. आठवड्यातून एकदा तरी ते रिकामे करून कोरडे करा.

स्वच्छता राखा : घर आणि घराच्या परिसराची स्वच्छता राखा.

सुरक्षा वापरा : रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करा. डास प्रतिबंधक क्रिम लावा.

लक्षणे दिसल्यास त्वरित तपासणी करा : ताप, डोकेदुखी, अंगदुखी, डोळ्यांच्या मागे वेदना किंवा अंगावर लालसर पुरळ दिसल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा डॉक्टरांना दाखवा.