गडचिरोली : जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीच्या पुरामुळे चार दिवसांपासून गावात अडकून पडलेल्या एकलव्या शाळेवरील चार शिक्षकांना अखेर प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन पथकाने सुरक्षितपणे बाहेर काढले. हे शिक्षक दिल्ली येथे 23 ऑगस्ट रोजी होणाऱ्या केंद्र सरकारच्या दिल्ली सबॅार्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या (DSSSB) परीक्षेसाठी जाणार होते. त्यांना एसडीआरएफच्या टीमच्या मदतीने मोटारबोटच्या माध्यमातून पर्लकोटा नदीच्या पुरातून हेमलकसा येथे पोहोचविल्यानंतर ते दिल्लीच्या दिशेने रवाना झाले.
या चार शिक्षकांमध्ये तीन महिलांचा समावेश होता. 23 ऑगस्टला दिल्लीत परीक्षा असल्याने त्यांना 20 ऑगस्टपर्यंत निघायचे होते. पण पर्लकोटा नदीचे पाणी चार दिवसांपासून पुलावरून वाहात असल्याने त्यांना तेथून बाहेर पडणे शक्य होत नव्हते. ही बाब प्रशासनाला कळविल्यानंतर विशेष मोहिम राबवून राज्य आपत्ती प्रतिसाद पथकाच्या (एसडीआरएफ) मदतीने मोटारबोटद्वारे त्यांना पर्लकोटा नदी पार करून हेमलकसा येथे पोहोचविण्यात आले. यानंतर ते शिक्षक पुढे दिल्लीच्या प्रवासासाठी रवाना झाले.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या शिक्षकांच्या परीक्षेचे महत्त्व लक्षात घेऊन तहसील प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महसूल प्रशासन, नगरपंचायत भामरागड तसेच एसडीआरएफ टीमने समन्वय साधून ही मोहिम यशस्वी केली.