ट्रक अपघातातील कुटुंबियांना मुख्यमंत्री निधीतून 5 लाख

मदतीचे धनादेश पालकांना वाटप

गडचिरोली : गडचिरोली ते आरमोरी महामार्गावरील काटली गावाजवळ 7 ऑगस्ट रोजी ट्रकने दिलेल्या भीषण धडकेत मृत्यूमुखी पडलेल्या 4 निरागस मुलांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये, अशी एकूण 20 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि आमदार डॉ.मिलींद नरोटे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात मृतकांच्या पालकांना या मदतीचे धनादेश गुरूवारी प्रदान करण्यात आले.

या अपघातात पिंकू नामदेव भोयर (14 वर्ष), तन्मय बालाजी मानकर (16), दिशांत दुर्योधन मेश्राम (15) आणि तुषार राजेंद्र मारबते (14) या चार विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या अपघातानंतर गावकऱ्यांनी 4 तास रास्ता रोको आंदोलन केले होते. त्याचवेळी मुख्यमंत्र्‍यांनी त्या कुटुंबियांना मदत जाहीर केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील मदतीचे धनादेश काल त्या मुलांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले.

धनादेश वितरणावेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे नायब तहसीलदार चंदू प्रधान आणि डॉ.मनोहर मडावी तसेच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे व अनिल पोहनकर उपस्थित होते.

जखमींच्या उपचाराची जबाबदारी शासनाकडे

या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेले क्षितीज तुळशीदास मेश्राम (14) आणि आदित्य धनंजय कोहपरे (15) या दोघांना तातडीने हेलिकॉप्टरद्वारे नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या संपूर्ण उपचाराची जबाबदारी राज्य शासनाने स्वीकारली आहे. उपचारात कोणतीही कमतरता राहू नये, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत.