
भामरागड : तालुक्यात पुराच्या पाण्यात आणखी दोघांना जलसमाधी मिळाली. त्यात एका पुरूषासह एका आश्रमशाळेच्या विद्यार्थ्याचा समावेश आहे. यामुळे भामरागड तालुक्यात गेल्या दोन आठवड्यात पूरबळींची संख्या 4 झाली आहे.
रिशान प्रकाश पुंगाटी (6 वर्ष) रा.कोयार आणि टोका डोलू मज्जी (36 वर्ष) रा.भटपार अशी मृतांची नावे आहेत. रिशान याचा याच वर्षी लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेत पहिल्या वर्गात प्रवेश केला होता. पोळ्याच्या सणानिमित्त वडील प्रकाश पुंगाटी यांनी त्याला घरी आणले होते. घरी आल्यानंतर तो गावाजवळच्या नाल्यावर आंघोळ करण्यासाठी गेला, पण पाणी जास्त असल्याने तो नाल्यात वाहून गेला. बराच वेळ झाला तरी तो परतला नसल्याने शोधाशोध सुरू झाली. दुसऱ्या दिवशी महसूल विभागाच्या मदतीने त्याचा शोध घेतला असता नाल्यात त्याचा मृतदेह आढळला. कोयर नाल्यावर पूल नसल्यामुळे नाल्याच्या पाण्यातून पालकांना त्याचा मृतदेह खाटेवरून रुग्णालयाकडे न्यावा लागला.
दुसऱ्या घटनेतील भटपार येथील टोका डोलू मज्जी हे शेताजवळच्या नाल्यावर आंघोळीसाठी गेले असताना फिट येऊन नाल्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. ते मूळचे छत्तीसगडच्या बैरमगड तालुक्यातील हालेवाडा येथील रहिवासी होते, पण गेल्या 10 वर्षांपासून सासरे विठ्ठल वत्ते मडावी यांच्याकडे घरजावई म्हणून राहात होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली आणि दोन मुले असा परिवार आहे.