जिल्ह्यात 481 मंडळांमध्ये विराजमान होणार बाप्पा

गणेशोत्सवावर पावसाचे सावट

गडचिरोली : सर्वांना प्रतीक्षा असलेल्या आणि उत्साहाचे वातावरण निर्माण करणाऱ्या गणेशोत्सवाला आजपासून सुरूवात होत आहे. जिल्हाभरात 481 सार्वजनिक गणेश मंडळांनी 10 दिवसांच्या गणेशोत्सवासाठी रितसर नोंदणी केली आहे. याशिवाय दिड ते दोन हजार कुटुंबांमध्ये गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. मात्र या उत्सवाची तयारी एकीकडे उत्साहाने सुरू असताना काल, मंगळवारी (दि.26) सायंकाळी गडचिरोलीत मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गणेशमूर्ती आणि उत्सवासाठी साहित्याची विक्री करणाऱ्यांसोबत गडचिरोलीकरांची मोठी तारांबळ उडाली.

आजपासून 10 दिवस, म्हणजे 6 सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या गणेशोत्सवादरम्यान गावात एकोपा राहावा, वादविवादातून पोलीस यंत्रणेवर येणारा ताण कमी व्हावा म्हणून सार्वजनिक मंडळांनी ग्रामीण भागात ‘एक गाव-एक गणपती’ ही संकल्पना राबविण्याचे आवाहन पोलीस विभागाकडून केले होते. त्याला 286 गावातील नागरिकांनी प्रतिसाद देत आपल्या गावात एकाच गणेशमूर्तीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला.

वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या, पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांसाठी जिल्हा प्रशासनाकडून उत्कृष्ट मंडळ स्पर्धाही ठेवण्यात आली आहे. त्यात आपल्या मंडळाचा नंबर लागावा यासाठी अनेक गणेशोत्सव मंडळ पुढे सरसावले आहेत.

अभिनव लॅानमधील विक्रेत्यांची पंचाईत

गडचिरोली शहरात दरवर्षी अभिनव लॅानच्या प्रांगणात गणेशमूर्तींच्या विक्रीसाठी मंडप टाकून दुकाने मांडली जातात. त्यात नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यातूनही विक्रेते गणेशमूर्ती घेऊन येत असतात. स्थानिक कुंभार समाज संघटनेमार्फत त्या दुकानांचे (स्टॅाल) बुकिंग केले जाते. त्यासाठी दोन दिवसांसाठी प्रतिदुकान 4 हजार रुपये घेण्यात आले. मात्र आज विक्रेते मूर्ती घेऊन आपल्या दुकानात पोहोचले तेव्हा त्या स्टॅाल्सबाहेर सर्वत्र पाणी आणि चिखल साचलेला होता. मूर्ती घेण्यासाठी दुकानांमध्ये पोहोचणाऱ्या नागरिकांनाही चिखलातून मार्ग काढत जावे लागत होते. संघटनेने केवळ आमच्याकडून भाडं घेतलं, पण कोणत्याच सुविधा दिल्या नसल्याची खंत विक्रेत्यांनी बोलून दाखवली. विशेष म्हणजे सायंकाळी जोरदार पाऊस झाल्याने तर मूर्ती विक्रीच्या स्टॅाल्सबाहेर आणखीच पाणी आणि चिखल साचला आहे. त्यामुळे आज त्या चिखलातून जाऊन मूर्ती खरेदी करण्याची वेळ गडचिरोलीकरांवर येणार आहे.