भामरागड : छत्तीसगडमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे भामरागडच्या सभोवताल वाहणाऱ्या पर्लकोटा, इंद्रावती आणि पामुलगौतम या नद्यांना पूर येऊन त्या पुराने पुन्हा एकदा भामरागडला कवेत घेतले आहे. पर्लकोटाचे पाणी भामरागडमधील 30 ते 35 दुकानांमध्ये शिरले आहे. दरम्यान एसडीआरएफच्या टिमने पहाटे 4 वाजता हिंदेवाडा येथील एका गर्भवती महिलेला पामुलगौतम नदीच्या पुरातून मोटारबोटने सुरक्षितपणे बाहेर काढून भामरागडच्या ग्रामीण रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल केले.
पर्लकोटाचे पाणी भामरागडमधील मुख्य बाजारपेठेत पोहोचले आहे. दरम्यान या पुराची चाहुल रात्रीच लागल्याने व्यापाऱ्यांनी दुकानातील आधीच सामान सुरक्षितस्थळी हलविले होते.
हिंदेवाडा येथील अर्चना विकास तिम्मा या महिलेची प्रसुती जवळ आली असताना ती गावातच होती. याबाबतची माहिती प्रशासनाला कळताच तहसीलदार किशोर बागडे यांनी तातडीने एसडीआरएफच्या चमुला त्या महिलेला ग्रामीण रुग्णालयापर्यंत आणण्यास सांगितले. या चमुने पहाटे 4 वाजता गावातून पुराच्या पाण्यातून त्या महिलेला सुरक्षितपणे बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले.
पर्लकोटावरील पूल पाण्याखाली गेल्याने पु्न्हा एकदा 100 पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला आहे.