गडचिरोली : गणेश चतुर्थीच्या पर्वावर बुधवारी जिल्हाभरात विघ्नहर्ता श्रीगणेशाचे 10 दिवसीय उत्सवासाठी आगमन झाले. जिल्ह्यात 481 सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींची वाजतगाजत मिरवणूक काढून प्रतिष्ठापना करण्यात आली. संध्याकाळपर्यंत सदर मिरवणुका सुरू होत्या.
‘एक गाव-एक गणपती’ या संकल्पनेनुसार 286 गावांमध्ये एकाच गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली. समाजजागृती करणारे देखावे, पर्यावरणपुरक उपक्रम यासाठी गणेश मंडळांसाठी प्रशासनाकडून स्पर्धा ठेवण्यात आल्याने हा उत्सव अधिक आदर्श स्वरूपात साजरा करण्यावर अनेक मंडळांकडून भर दिला जाणार आहे.
अनेक घरांमध्येही दिड दिवसांपासून तर 10 दिवसांपर्यंतच्या कालावधीसाठी गणेशमूर्ती मांडण्यात आल्या. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला वरूणराजाने डोळे वटारत जोरदार बरसून गणेशभक्तांची तारांबळ उडविली. बुधवारी दिवसभर पावसाने सवलत दिली, पण संध्याकाळी पुन्हा रिपरिप सुरू केली. गुरूवारी सुद्धा काही भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मात्र त्यानंतर पाऊस थोडा विश्रांती घेण्याची शक्यता असल्याने गणेशोत्सवाचा आनंद नागरिकाना घेता येईल.