गडचिरोली : स्वत:च्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करत तिची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या पतीला जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हत्येचा हा थरार धानोरा तालुक्यातील जपतलाई (कोवानटोला) या गावात तीन वर्षांपूर्वी घडला होता. प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश विनायक जोशी यांनी हा निकाल दिला.
परसराम धानुजी कुमरे (48 वर्ष) असे जन्मठेप झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने 3 आॅक्टोबर 2022 रोजी पत्नी मिराबाई परसराम कुमरे (37 वर्ष) हिच्याशी चारित्र्याच्या संशयातून भांडण केले. पण मनातील राग शांत झाला नाही. त्यामुळे पत्नीला कायमचे संपवण्यासाठी रात्री 1 वाजताच्या सुमारास खलबत्याच्या लोखंडी मुसळाने व चाकुने डोक्यावर वार करुन तिचा खून केला. याप्रकरणी परसराम कुमरे याची बहिण आशाबाई पोटावी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन धानोरा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
येरकड पोलीस मदत केंद्राचे पोउपनि आकाश ठाकरे यांनी आरोपी परसराम कुमरे याला अटक करत हे प्रकरण न्यायालयात दाखल केले. प्रमुख जिल्हा व न्यायाधीश विनायक आर.जोशी यांनी आरोपी परसराम धानुजी कुमरे याला भादंवि कलम 302 मध्ये दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा आणि 5,000 रुपये दंड ठोठावला आहे. तसेच दंड न भरल्यास 6 महिने वाढीव कारावासाच्या शिक्षेची तरतुद करण्यात आली.
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहा.जिल्हा सरकारी वकिल सचिन कुंभारे यांनी कामकाज पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी पोनि चंद्रकांत वाबळे, श्रेणी पोउपनि शंकर चौधरी, श्रेणी पोउपनि भैयाजी जंगटे, पोहवा जिजा कुसनाके, पोहवा मिनाक्षी पोरेड्डीवार, पोशि जीवन कुमरे, छाया शेट्टीवार यांनी कामकाज पाहीले.