गडचिरोली : गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफच्या पथकांनी संयुक्तपणे राबवविलेल्या आॅपरेशनमध्ये पोलिसांच्या गोळीने वेध घेतलेल्या चारही माओवाद्यांची ओळख पटली. त्यात एका पीसीसीएम दर्जाच्या वरिष्ठ कॅडरसह तीन सदस्यांचा समावेश आहे. त्यांच्यावर एकूण 14 लाखांचे बक्षीस गृह विभागाने ठेवले होते. पाऊस आणि जंगलातील प्रतिकुल परिस्थितीत तब्बल 48 तासांपेक्षा जास्त वेळ हे अभियान चालले, अशी माहिती पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
मृत माओवाद्यांपैकी पीपीसीएम मालु पदा (41 वर्षे) हा बुर्गी (रेंगावाही), ता.बेटीया, जि.कांकेर (छ.ग.) येथील रहिवासी होता. त्याच्यावर 6 लाख रुपयाचे बक्षीस होते. त्याच्यावर चकमकीचे 5, खुनाचा 1 आणि जाळपोळ व इतर असे 8 गुन्हे दाखल आहेत. महिला माओवादी क्रांती ऊर्फ जमुना रैनु हलामी (32 वर्षे), रा.बोधीनटोला, ता.धानोरा हीसुद्धा कंपनी क्र.10 मध्ये सदस्य होती. तिच्यावर 4 लाखांचे बक्षीस होते. 13 चकमकी, 6 खून, जाळपोळ व इतर असे 27 गुन्हे दाखल आहेत. ज्योती कुंजाम (27 वर्षे), रा.बस्तर एरीया (छत्तीसगड) ही अहेरी दलमची एकमेव शिल्लक सदस्य होती. तीसुद्धा या चकमकीत मारल्याने गेल्याने माओवाद्यांचा अहेरी दलम पूर्णपणे नेस्तनाबूत झाला आहे. तिच्यावर चकमकीचे 7, खुनाचा 1 असे 8 गुन्हे आहेत. तिच्यावर 2 लाखांचे इनाम होते. तसेच गट्टा दलमची मंगी मडकाम (22 वर्षे), रा.बस्तर एरीया (छत्तीसगड) हिच्यावरही चकमकीचे 2 व इतर 1 गुन्हा असून तिच्यावर 2 लाखांचे बक्षीस होते.
घटनास्थळावरून एक एसएलआर रायफल, दोन इन्सास रायफल आणि एक 0.303 रायफल, तसेच 92 जिवंत काडतूस आणि 3 वॉकी टॉकी असे साहित्य जप्त करण्यात आले.
असे राबविले अभियान
महाराष्ट्र–नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात घातपाती कारवाया घडवून आणण्याच्या उद्देशाने गट्टा दलम, कंपनी क्र.10 व इतर दलमचे काही माओवादी एकत्र येऊन दबा धरुन बसले असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम.रमेश यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाच्या 20 तुकड्या व सीआरपीएफ क्यु.ए.टी.च्या 2 तुकड्या 25 आॅगस्ट 2025 रोजी तातडीने सदर जंगल परिसरात रवाना करण्यात आल्या होत्या.
अवघड जंगल परिसर व प्रतिकूल हवामानाचा सामना करत, सतत सुरु असलेल्या पावसादरम्यान दोन दिवस पायी चालत जाऊ पोलीस पथके त्या जंगल परिसरात पोहोचली. दरम्यान दि.27 रोजी सकाळी जंगलात दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी जवानांना जीवे ठार मारण्याच्या व हत्यार लुटण्याच्या उद्देशाने गोळीबार सुरु केला. त्यावेळी पोलिसांनी माओवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवुन शरण येण्याचे आवाहन केले असता, माओवाद्यांनी पोलिसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला. जवानांनी प्रत्युत्तरादाखल व स्वसंरक्षणासाठी माओवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून माओवाद्यांनी घनदाट जंगलात पळ काढला. पण नंतर शोधमोहिमेत चार माओवाद्यांचे मृतदेह सापडले.
जवान महेश नागुलवारच्या खुनाचा बदला
या अभियानात पोलिसांना पहिल्यांदाच माओवाद्यांच्या कंपनी क्र.10 च्या दोन लोकांना कंठस्नान घालण्यात यश आले. 11 फेब्रुवारी रोजी महेश नागुलवार या सी-60 जवानाला याच कंपनी क्र.10 च्या सदस्यांसोबत झालेल्या चकमकीत वीरमरण आले होते. त्याचा बदला यावेळी जवानांनी घेतला. कंपनी क्र.10 ही नक्षल्यांचा गड असलेल्या अबुझमाडच्या जंगलात सुरक्षा दलांचे जवान शिरणार नाही यासाठी बॅार्डर सुरक्षेचे काम पाहात आहे. पण यावेळी गडचिरोली पोलिसांनी पहिल्यांदा त्यांना टार्गेट केले, अशी माहिती पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.
आता केवळ 25 नक्षलवादी शिल्लक
गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांच्या रेकॅार्डवर दोन महिन्यांपूर्वीपर्यंत केवळ 28 सशस्र माओवादी शिल्लक होते. आता त्यातील 3 जणांसह एका छत्तीसगडमधून आलेल्या माओवाद्याच्या मृत्यूमुळे जिल्ह्यात 25 सशस्र माओवादी शिल्लक आहेत, असे नीलोत्पल यांनी सांगितले.
हे माओवादविरोधी अभियान अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ.छेरिंग दोरजे, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलीस उपमहानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, उपकमांडंट सीआरपीएफ सुमित वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम.रमेश यांच्या नेतृत्वात सी-60 आणि सीआरपीएफ क्यु.ए.टी.च्या जवानांनी यशस्वीपणे पार पाडले.