मुलचेरा : शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण आणि ज्ञानवर्धन अधिक प्रभावी करण्यासंदर्भात नवी दिल्लीत एका कार्यशाळेचे आयोजन केले आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून गडचिरोली आणि नंदूरबार जिल्ह्यातील दोन आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापकांची निवड करण्यात आली आहे. त्यात गडचिरोली जिल्ह्यातून मुलचेरा तालुक्यातील गणेशनगरच्या जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुजय बाछाड यांना संधी मिळाली आहे. 26 ते 29 ऑगस्टदरम्यान नवी दिल्लीतील एनसीईआरटी येथे आयोजित कार्यशाळेत त्यांनी सहभाग घेतला.
एनसीएसएल निपा नवी दिल्लीमार्फत ‘मटेरियल डेव्हलपमेंट अँड कपॅसिटी बिल्डिंग वर्कशॉप ऑन इंटिग्रिटिंग नॉलेज सिस्टीम इन स्कूल लीडरशिप डेव्हलपमेंट’ या विषयावर या चार दिवसीय कार्यशाळेचे आयोजन 26 ते 29 ऑगस्ट या काळात केले होते. या कार्यशाळेत तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश व मणिपूर या राज्यातील प्रत्येकी दोन मुख्याध्यापकांची निवड करण्यात आली होती.
महाराष्ट्रामधून या कार्यशाळेत सहभागाची संधी मिळालेले गडचिरोली जिल्ह्यातील मुख्याध्यापक सुजय जगदीश बाछाड आणि नंदुरबार जिल्ह्यातील वरूळ जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अनिल माळी हे दोघेही महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक आहेत. ते उपक्रशील मुख्याध्यापक म्हणून ओळखले जातात. ‘भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित शिक्षण’ या विषयावरील चर्चेतही त्यांनी सहभाग घेतला.
या कार्यशाळेसाठी मुख्याध्यापक बाछाड यांना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बळीराम चौरे यांचे मार्गदर्शन लाभले.