कुरखेडा : तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आमदार रामदास तडस यांनी येथे आयोजित केलेल्या जनता दरबारात नागरिकांनी विविध तक्रारींचा पाऊसच पाडला. त्यात प्रामुख्याने महामार्गाची दुरवस्था, अतिक्रमण, शहरात उघडपणे केली जाणारी दारू विक्री यावर जोरदार चर्चा झाली. दारूबंदीची अंमलबजावणी शक्य नसेल तर ती उठवली पाहिजे, त्याची समीक्षा केली पाहिजे, असा सूर नागरिकांनी आळवला.
मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या सती नदीवरील पुलाच्या बांधकामाबाबत आणि गोठणगाव टी-पॉइंट ते जांभुरखेडा मार्गाच्या खराब स्थितीबाबत नागरिकांनी महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना घेरले. “नागरिकांना किती दिवस त्रास देणार? कामाची गुणवत्ता आणि उपाययोजना काय?” असे प्रश्न विचारत त्यांनी प्रशासकीय दुर्लक्षितपणावर बोट ठेवले. कुरखेडा मुख्य बाजारपेठेतील महामार्गावरच्या अतिक्रमणधारकांना वाचवत हा मार्ग अरुंद केला जात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला. तसेच, शहरातील निकृष्ट नाल्यांच्या बांधकामाबाबत आणि त्यांच्या अपूर्णतेबाबतही विभागावर टीका झाली. यावर कंत्राटदाराने नगरपंचायत प्रशासनाचे सहकार्य नसल्याचे सांगितले, तर नगरपंचायतीने पत्रव्यवहार नसल्याचा आणि पाणीपुरवठा वाहिनीला नुकसान होत असल्याचा आरोप केला.
दोन्ही बाजूंचे आरोप-प्रत्यारोप ऐकून आमदार मसराम यांनी कामाची गुणवत्ता सुधारण्याच्या सूचना देत, कोणतेही काम समन्वयाशिवाय शक्य नाही. नगरपंचायत आणि कंत्राटदारांनी एकत्र येऊन नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, असे सांगितले.
दारूबंदीची समीक्षा करा
दरम्यान, कुरखेडा शहरातील अवैध दारू विक्रीवर पोलीस विभागाने वर्षभरात 110 कारवाया केल्याचे आकडे मांडले. मात्र, नागरिकांनी त्यावर आक्षेप घेत मुख्यालयातील देशी-विदेशी दारू विक्रेत्यांना सोडून जंगलातील हातभट्टीवरच कारवाई होत असल्याचा आरोप केला. आंबेडकर चौक, गांधी वार्ड, आझाद वार्ड येथील उघडपणे चालू असलेल्या दारू विक्रीला कोण जबाबदार आहे, असा सवाल करण्यात आला. एका मोठ्या पुरवठादाराला अभय मिळाल्याने विक्री जोमात सुरू असल्याचा मुद्दाही उपस्थित झाला. पोलीस विभागाने त्या पुरवठादारावरही कारवाई केल्याचे सांगितले. अखेर नागरिकांनी आमदार मसराम यांना गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदीची समीक्षा विधानसभेत करून बंदी हटविण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली. “कारवाईनंतरही विक्री सुरू राहात असेल तर बंदी हटविणे हा एकमेव पर्याय आहे,” असा सूर शेवटी या जनता दरबारात व्यक्त झाला.
या जनता दरबारात तालुक्यातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. विविध विभागांकडून जवळपास 90 लेखी तक्रारी नोंदवून त्यांचे निराकरण करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार राजकुमार धनबाते, नायब तहसीलदार आमदवार, राहुल आंबिलकर, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जीवन नट, जिल्हा उपाध्यक्ष जयंत हरडे, विधानसभा प्रमुख परसराम टिकले, माजी सभापती गिरीधर तितराम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.