यावर्षी मिरवणुकांमध्ये लेझर लाईट्स दिसले तर कारवाई

अपघात टाळण्यासाठी बंदी

​गडचिरोली : गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद सणाच्या मिरवणुकींमध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी लेझर लाईटच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 (1) अंतर्गत हा आदेश जारी केला आहे.

मागील वर्षी कोल्हापूरमध्ये लेझर लाईटमुळे डोळ्यांना झालेल्या दुखापती आणि यवतमाळ येथे धार्मिक तेढ निर्माण झाल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 5 ते 7 सप्टेंबर 2025 या कालावधीत ही बंदी लागू राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.