गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त होईपर्यंत मी लढत राहणार

सी-60 चे कमांडर मडावींचा निर्धार

गडचिरोली : गडचिरोली पोलिसांच्या सी-60 (सी-सिक्स्टी) कमांडो पथकाचे प्रमुख पीएसआय वासुदेव मडावी हे नक्षलवाद्यांसाठी कर्दनकाळ ठरले आहेत. 27 आॅगस्टच्या चकमकीतील 4 नक्षल्यांचा कंठस्नान घातल्यानंतर पथकाने घेतलेल्या नक्षल बळींची संख्या 101 झाली आहे. वयाची पन्नाशी गाठत असताना मडावी यांची जंगलातील कठिण परिस्थितीत आपले कर्तव्य निभावण्याची ऊर्जा कायम आहे. जिल्हा पूर्णपणे नक्षलमुक्त होईपर्यंत असेच लढत राहणार, हीच आपली इच्छा असल्याची भावना वासुदेव मडावी यांनी व्यक्त केली.

पोलीस शिपाई म्हणून जिल्हा पोलीस दलात रूजू झाल्यानंतर वासुदेव मडावी यांनी गेल्या 26 वर्षात 58 नक्षलविरोधी अभियानांमध्ये सहभाग घेतला आहे. त्यांचे कौशल्य पाहून त्यांना सी-60 पथकाचे कमांडर म्हणून जबाबदारी देण्यात आली. त्यांनी आतापर्यंत 5 नक्षलींना अटक केली आहे. आतापर्यंत त्यांच्यासह त्यांच्या पथकाने जो 101 नक्षलींचा वेध घेतला, त्याचे श्रेय केवळ स्वत:कडे न घेता हे माझ्या टिमचे श्रेय आहे, असेही मडावी सांगतात. वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी पार पाडताना त्यांच्या अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी कशी करता येईल हा माझा नेहमी प्रयत्न राहिला, असे ते प्रामाणिकपणे सांगतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वारंवार त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन तीन वेळा वेगवर्धित पदोन्नती दिली. त्यामुळे आज मडावी पोलीस उपनिरीक्षक झाले आहेत. याशिवाय राष्ट्रपती शौर्य पदक, असाधारण आसूचना कुशलता पदक आणि पोलीस महासंचालकांची सन्मानचिन्ह त्यांना मिळाले आहे. एवढेच नाही तर आणखी दोन पदकांसाठी आणि एका पदोन्नतीसाठी त्यांची शिफारस करण्यात आली आहे.

मडावी यांच्यासारखे हिंमतबाज पोलीस अधिकारी-कर्मचारी हीच गडचिरोली पोलिसांची खरी ताकद आहे, त्यामुळे आम्ही यशस्वी ठरल्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले.

जीवंत परत येणार की नाही, असे वाटत होते पण…

आपल्या आयुष्यातील कसनासूर-बोरिया ही सर्वात मोठी आणि खतरनाक चकमक होती असे मडावी यांनी सांगितले. तो अनुभव सांगताना मडावी म्हणाले, एकाचवेळी 70 ते 80 सशस्र नक्षलवादी आमच्यावर फायरिंग करत होते. आम्हाला डोकं वर काढून पहायलाही संधी मिळत नव्हती. त्यामुळे आज आपण जीवंत परत जाणार की नाही, अशी भितीही मनात वाटत होती. पण आम्ही डगमगलो नाही, हिंमत कायम होती. आम्ही एक-एक राऊंड फायर करत त्यांना 6 ते 7 तास गुंतवून ठेवले आणि त्यांच्याकडील काडतूस संपत आल्याचे लक्षात आल्यानंतर चढाई केली. त्यामुळे मोठे यश त्यावेळी मिळाले होते, असे मडावी सांगतात.

वासुदेव मडावी यांच्या नेतृत्वातील पथकाचे प्रमुख यश

1. बोरीया कसनासूर – एकूण 40 माओवाद्यांना कंठस्नान,
2. गोविंदगाव चकमक – एकूण 6 माओवाद्यांना कंठस्नान
3. मर्दिनटोला चकमक – एकूण 27 माओवाद्यांना कंठस्नान
4. कोपर्शी-कोढूर चकमक – एकूण 5 माओवाद्यांना कंठस्नान
5. कतरंगट्टा चकमक – एकूण 3 माओवाद्यांना कंठस्नान
6. कोपर्शी चकमक – एकूण 4 माओवाद्यांना कंठस्नान