‘सेवा पंधरवडा’त तीन टप्प्यात राबवविणार विविध उपक्रम

सूक्ष्म नियोजन करा- जिल्हाधिकारी

गडचिरोली : महसूल विभागातर्फे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत “सेवा पंधरवडा” राबविण्यात येणार आहे. महसूल प्रशासनाला अधिक लोकाभिमुख बनवत या पंधरवड्यात शेवटच्या घटकापर्यंत शासकीय सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने करावयाची सर्व कामे वेळेवर आणि युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी सुक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महसूल प्रशासनाला दिल्या.

या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय असोले, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रणजित यादव (गडचिरोली), अरुण एम. (चामोर्शी), अनुष्का शर्मा (देसाईगंज), निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी प्रसेनजीत प्रधान, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख विजय भालेराव, जिल्हा खनिकर्म अधिकारी इम्रान शेख तसेच दूरदृष्य प्रणालीद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.

या अभियानांतर्गत पुढीलप्रमाणे तीन टप्प्यांमध्ये विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

पहिला टप्पा (17 ते 22 सप्टेंबर)- पांदण रस्ते मोहीम : या टप्प्यात पांदन / शिवार रस्त्यांना क्रमांक देणे, त्यांचे सर्वेक्षण करणे, गाव नकाशावर चिन्हांकित करणे, आणि त्यांची नोंद करणे यासारख्या कामांवर भर दिला जात आहे. तसेच, शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी संमतीपत्रे घेणे आणि प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी ‘रस्ता अदालत’ आयोजित केल्या जाणार आहे.

दुसरा टप्पा (23 ते 27 सप्टेंबर) – सर्वांसाठी घरे आणि पट्टे वाटप मोहीम : या टप्प्यात ‘सर्वांसाठी घरे’ या उपक्रमांतर्गत घरे बांधण्यासाठी उपलब्ध असलेल्या शासकीय जमिनींचे पट्टे वाटप करणे. तसेच शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे नियमानुसार नियमित करणे व या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना जमिनीचे पट्टेही वाटप केले जाणार आहेत.

तिसरा टप्पा (28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर)- नावीन्यपूर्ण उपक्रम : या टप्प्यात जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक गरजा आणि भौगोलिक परिस्थिती विचारात घेऊन विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे सांगितले. सर्व संबंधित विभागांनी या अभियानासाठी समर्पित भावनेने कार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव केला जाईल. तसेच, स्थानिक लोकप्रतिनिधी यांना या अभियानात सहभागी करून घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय असोले यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. बैठकीला महसूल विभागाचे सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.