डार्ली गावातील अवैध सुगंधित तंबाखूच्या कारखान्यावर धाड

एकाला अटक, चौघांचा शोध सुरू

गडचिरोली : महाराष्ट्रात प्रतिबंधित केलेल्या सु्गंधित तंबाखूची राज्यात कुठेही विक्री, वाहतूक किंवा उत्पादन करण्यास प्रतिबंध आहे. मात्र आरमोरी तालुक्यातल्या डार्ली गावात चक्क सुगंधित तंबाखूचा कारखानाच अवैधपणे सुरू होता. आरमोरी पोलिसांच्या दुर्लक्षामुळे सुरू असलेल्या या कारखान्यावर अखेर पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकून कारवाई केली.

या कारवाईत घटनास्थळावरून एकूण 7 लाख 84 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. डार्ली गावातील रेखाबाई सडमाके यांच्या घरात ओमप्रकाश गेडाम व इतर चार इसमांनी बनावट सुगंधित तंबाखूचा कारखाना सुरू केल्याची कुणकुण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला लागली होती. त्यासाठी लागणाऱ्या मिशनरी त्यांनी घरात बसवल्या होत्या. जिल्हाभर मोठ्या प्रमाणात विक्री होणारा खर्रा बनविण्यासाठी हा सुगंधित तंबाखू वापरला जातो. त्यामुळे जिल्हाभरात या तंबाखूचा पुरवठा करण्याची आरोपींची योजना होती.

दरम्यान वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली असता रेखाबाई सडमाके (42 वर्षे), रा.डार्ली यांच्या घरी पोहचून पंचासमक्ष झडती घेतली असता, घरामध्ये सुगंधित तंबाखूने भरलेल्या टिनाच्या डब्यांचे विविध बॉक्स व सुगंधित तंबाखूचे उत्पादन करण्याकरीता आवश्यक असणारे साहित्य मिळून आले. सदर सर्व तंबाखू व साहित्य जप्त करण्यात आले. त्यामध्ये खालीलप्रमाणे साहित्य मिळून आले.
* 2 राखडी खरड्याच्या बॉक्समध्ये 65 नग मजा 108 हुक्का, शिशा तंबाखू कंपनीचे 200 ग्रॅम वजनाचे टिनाचे डबे (प्रति डबा अवैध विक्री किंमत 2,000 रुपये)
* मजा 108 हुक्का – शिशा तंबाखू कंपनीचे 10 खरड्याचे बॉक्स (प्रत्येक बॉक्समध्ये 50 ग्रॅम वजनाचे 10 नग टिनाचे डबे), असे एकूण 100 नग टिनाचे डबे (अवैध विक्री किंमत – 300 रुपये प्रमाणे)
* कच्चा तंबाखू असलेल्या 24 नग चुंगळ्या, प्रत्येकी 3 कि.ग्रॅ. वजनाच्या 96 चुंगळ्या, असे एकूण 288 कि.ग्रॅ. (अवैध विक्री किंमत – 1000 रुपये प्रमाणे)
* 200 ग्रॅम वजनाचा मजा 108 हुक्का शिशा तंबाखू पॅकिंग करण्याची लोखंडी मशिन (अंदाजे किंमत 80,000 रुपये)
* 50 ग्रॅम वजनाचा मजा 108 हुक्का शिशा तंबाखू टिनाचा डबा पॅकिंग करण्याची इलेक्ट्रीक मोटर असलेली लोखंडी मशिन (किंमत 1,10,000 रुपये).
* होला हुक्का शिशा तंबाखू प्लॅस्टीक पिशवी पॅकिंग करण्याची लोखंडी मशीन, (अंदाजे किंमत 65,000 रुपये)
* बॅग क्लोजर प्लॅस्टीक चुंगळी शिलाई मशीन (अंदाजे किंमत – 50,000 रुपये)
* इलेक्ट्रीक वजन काटा (अंदाजे किंमत 15,000 रुपये)
* होला हुक्का शिशा तंबाखू पॅकिंग करण्यासाठी वापरलेली हेअरस्ट्रेटनर 2 नग (प्रत्येकी किंमत 2000 रुपये प्रमाणे)
* इतर – रिकामे टिनाचे डबे, टिनाच्या डब्याला सिल करण्याकरीता वापरल्या जाणारे सिल, टिनाचे गोल झाकण, प्लास्टिक टेप (चिकटपट्टी), पांढ­ऱ्या रंगाच्या नायलॉनच्या पट्टया, कागदी खरड्याचे बॉक्स, हिरव्या रंगाची प्लास्टिक पिशवी, प्लास्टिक पाऊच, स्टिकर्स इ. साहित्य.

असा एकूण रु. 3 लाख 31 हजार रुपयांचा अवैध सुगंधित तंबाखूचा साठा आणि एकूण 4 लाख 53 हजार 200 रुपयांच्या सुगंधित तंबाखू तयार करण्याकरीता लागणाऱ्या मशीन व इतर साहित्य मिळून एकूण 7 लाख 84 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाने पोलीस स्टेशन आरमोरी येथे आरोपींविरुद्ध कलम – 59 (i), 26 (2) (i), 26(2) (iv), 27(3) (e), 3(1)(zz) (iv) अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम-2006 सहकलम 3 (5), 275, 274, 223, 123 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणात ओमप्रकाश शंकर गेडाम याला पोलिसांनी अटक केली. इतर चार आरोपी पसार झाले असून त्यांचा शोध सुरु आहे. सदर गुन्ह्राचा पुढील तपास आरमोरी पो.स्टे.चे पो.उपनिरीक्षक संतोष कडाळे हे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात स्थागुशाचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सपोनि.समाधान दौड, हवालदार प्रेमानंद नंदेश्वर, अंमलदार राजकुमार खोब्रागडे, रोहित गोंगले, चालक गणेश पवार यांनी केली.