तेलंगणात होणारी सागवान तस्करी वनविभागाने रोखली

कारसह सागवान लठ्ठे जप्त

सिरोंचा : गडचिरोली जिल्ह्यातून तेलंगणात होणारी सागवान लाकडांची तस्करी रोखण्यात सिरोंचा वनविभागाच्या आसरअल्ली परिक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांना यश आले. या कारवाईत एक कार आणि सागाच्या लठ्ठ्यांसह 6.28 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच कार चालकाला अटक करण्यात आली.

कोपेला-सोमनपल्ली जंगलातून सागवान लाकडांची तस्करी केली जात असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला. संशयित झायलो वाहनाला (क्रमांक टीएस 12, युबी 3262) पथकाने पहाटे अडविण्याचा प्रयत्न केला, पण वाहनचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. वनकर्मचाऱ्यांनी वाहन अडवत तपासणी केली असताना त्यात सागवानाचे लठ्ठे कापून ठेवलेले आढळले. यामुळे वाहनचालक रमेश सत्यनारायण कैरोजू (रा.आझमनगर, जि.भोपालपल्ली, तेलंगणा) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर भारतीय वन अधिनियम 1927 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई उपवनसंरक्षक एस.नवलकिशोर रेड्डी आणि उपविभागीय वनअधिकारी अक्षय मिना यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी एस.जी.सुरपाम यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

मागिल महिन्यातही बोलेरो वाहनातून अशाच पद्धतीने सागवानाची तस्करी करणाऱ्यांना पकडले होते. तरीही तस्करांची हिंमत कमी झालेली नाही.