‘धानाची तातडीने उचल करा, नाहीतर जनतेला मोफत वाटा’

लाखो क्विंटल धान उघड्यावरच

अहेरी : शेतकऱ्यांनी घाम गाळून, उन्हातान्हात मेहनत करून उत्पादित केलेला धान आज शासनाच्या निष्काळजीपणामुळे उघड्यावर पडून सडत आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या अहेरी उपविभागातील सर्व पाचही तालुक्यांतील (एटापल्ली, भामरागड, मूलचेरा, अहेरी, सिरोंचा) खरेदी केंद्रांवर मागील अनेक महिन्यांपासून लाखो क्विंटल धान पडून आहे. सततच्या पावसामुळे या धानाची नासाडी होऊन कोट्यवधी रुपयांचे नुकसान शासनाला सहन करावे लागत आहे. त्यामुळे तातडीने या धानाची भरडाईसाठी उचल करा, नाहीतर ते जनतेला मोफत वाटप करा, अशी मागणी ऑल इंडिया किसान सभेने केली आहे. येत्या 15 दिवसात धानाची उचल न झाल्यास “धान फेको आंदोलन” करण्याचा इशाराही देण्यात आला.

टीडीसीच्या केंद्रांवर उघड्यावर असलेल्या धानाची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली आहे. अनेक ठिकाणी तर धान खाण्यायोग्य राहिलेला नाही. धानाची अशी नासाडी होणे म्हणजे जनतेच्या ताटातील अन्न हिरावून घेण्याचा प्रकार आहे. एकीकडे अनेक गावांमध्ये कुटुंबांना दोन वेळचे पोटभर जेवण मिळत नाही, आणि दुसरीकडे शासन मात्र हा धान सडू देत आहे. हा कारभार जनविरोधी वृत्तीचा जिवंत पुरावा असल्याचे ऑल इंडिया किसान सभेने म्हटले आहे.

या गंभीर प्रश्नावर किसान सभेच्या गडचिरोली जिल्हा कौन्सिलतर्फे आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक व्यवस्थापकांना (अहेरी) निवेदन देण्यात आले. त्यात सडत असलेला सर्व धान 15 दिवसांच्या आत तातडीने उचलावा आणि जर धानाची उचल शक्य नसेल, तर तो तसाच खराब होण्याऐवजी स्थानिक जनतेला मोफत वाटप करा, अशी मागणी केली. यााकडे दुर्लक्ष केल्यास किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकरी रस्त्यावर उतरून “धान फेको आंदोलन” करतील. यात सडलेले व कुजलेले धान ट्रक, ट्रॅक्टर आणि बैलगाड्यांतून भरून थेट महामंडळाच्या कार्यालयासमोर फेकण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

निवेदन देताना किसान सभेचे सचिन मोतकुरवार (अध्यक्ष, अहेरी विधानसभा), सूरज जक्कुलवार (जिल्हा सदस्य), रमेश कवडो (तालुका अध्यक्ष) व सत्तू हेडो (ता.उपाध्यक्ष) हे उपस्थित होते.