गडचिरोली : शिक्षक आमदार सुधाकर अडबाले त्यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी रणजित यादव यांची भेट घेऊन शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील समस्यांवर चर्चा केली. यावेळी प्रकल्प अधिकाऱ्यांनी त्या समस्या व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. बहुतांश सर्व समस्या महिनाभरात दूर केल्या जातील, असे आश्वासन प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिले.
सीटू संलग्नित शासकीय व अनुदानीत आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेद्वारे आ.अडबाले यांच्यामार्फत आश्रमशाळेतील समस्या व कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन प्रकल्प अधिकाऱ्यांना यावेळी सादर करण्यात आले. सर्व समस्या व कर्मचाऱ्यांच्या मागण्या आमदार अडबाले यांनी प्रभावीपणे मांडल्या. खेळीमेळीच्या वातावरणात निवेदनातील सर्व समस्या व मागण्या प्रकल्प अधिकारी रणजित यादव यांनी जाणून घेतल्या. त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनाची अडबाले यांनी प्रशंसा केली.
यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी वहीद शेख, डॉ.प्रभू सादमवार, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नैताम, कार्यवाह अजय लोंढे, शेमदेव चापले, सतीश पवार उपस्थित होते.
सादर केलेल्या निवेदनात प्राथमिक शिक्षकांना 4300 ग्रेड पे नुसार, तसेच अनुदानित आश्रमशाळेतील माध्यमिक शिक्षकांना 4800 ग्रेड पे नुसार सुधारीत एकस्तर वेतन निश्चित करणे, कमी केलेल्या उन्हाळी सुटीच्या कालावधीच्या अर्जित रजा मिळणे, संबंधित कर्मचाऱ्यांना 1 हजार 500 रुपये प्रोत्साहन भत्ता लागू करणे व त्याची थकबाकी अदा करणे, प्रलंबित प्रवास देयके तातडीने अदा करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देणे, 200 च्या वर विद्यार्थिनी संख्या असलेल्या आश्रमशाळेत अतिरिक्त महिला अधीक्षिकेची नेमणूक करणे, तासिका तत्वावरील शिक्षकांना तातडीने आदेश देणे, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना गणवेश देणे, महिला सफाई कर्मचारी व सुरक्षा रक्षक पदे भरणे, वार्षिक वेतनवाढ लावणे, नादुरुस्त निवासस्थानाचे घरभाडे कपात न करणे, अनुदानित आश्रमशाळेचे वेतन महिन्याच्या 1 तारखेला करणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन, ग्रॅज्युएटी, भविष्य निर्वाह निधी, गट विमा, रजा रोखीकरण इत्यादींचा लाभ अदा करणे, आदी तसेच काही कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक समस्या व मागण्यांचा यात समावेश होता.
यावेळी शिष्टमंडळात संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष राधेश्याम पत्रे, गडचिरोली प्रकल्प अध्यक्ष देव बन्सोड, विभागीय सहसचिव विकास जनबंधू, प्रसिद्धी प्रमुख सुधीर शेंडे, उपाध्यक्ष काशिनाथ कुंडगीर, सहकार्याध्यक्ष जितु गजभिये , विवेक विरुटकर, संतोष धोटे, सुनिता मस्के, जयश्री सहारे, यादव धानोरकर, अंकलेश गणवीर, धर्मेंद्र कुसराम, गुलाब हर्षे, अविराज भुजाडे, अशोक परतेकी, योगिता बिसेन, पुरुषोत्तम डोंगरवार, शारदा पेदापल्ली, सोनल कुळसंगे, रमेश कोरचा, सचिन खोब्रागडे यांच्यासह शासकीय व अनुदानित आश्रमशाळांचे कर्मचारी उपस्थित होते.