गडचिरोली : गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची शनिवारी सांगता झाली. संध्याकाळी सुरू झालेल्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. या मिरवणुकांमधील देखावे, आतिषबाजी आणि माहौल पाहण्यासोबत गणरायाला निरोप देण्यासाठी गडचिरोलीकरांनी इंदिरा गांधी चौकासह सर्व प्रमुख मार्गांवर एकच गर्दी केली होती.
शहरातील प्रमुख गणेश मंडळांच्या मिरवणुकांमध्ये डीजेच्या तालावर वाजणाऱ्या गीतांवर मंडळाच्या कार्यकर्त्यांसह गणेशभक्त थिरकत होते. यासोबत पारंपरिक वाद्यांसह दिंड्याही होत्या. शिवशंकराच्या वेशभुषेतील कलावंतांसह सहकलावंतांनी सादर केलेल्या शिवतांडवाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. याशिवाय विविध प्राण्यांच्या वेशभुषेतील कलावंतांनी मुलांसह मोठ्यांचेही मनोरंजन केले.
विविध मंडळांमध्ये आतिषबाजीची जणू स्पर्धाच लागल्यासारखे वाटत होते. गडचिरोलीकरांनी हे आतिषबाजीचे नजारे डोळ्यात साठवत त्याचा आनंद घेतला. या विसर्जन मिरवणुकांमधील कार्यकर्त्यांचा उत्साह आणि पाहण्यासाठी नागरिकांची जमलेली गर्दी पाहता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे आणि इतर अधिकारी जातीने लक्ष ठेवून होते.
आ.डॅा.नरोटे यांच्या कार्यालयातून निघाली दिंडी
गडचिरोलीचे आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या गडचिरोलीतील कार्यालयात भाजपच्या वतीने गणेशाची स्थापना करण्यात आली होती. 10 दिवस अनेक मान्यवरांच्या हस्ते आरती व पुजा केल्यानंतर शनिवारी दुपारी भक्तिमय वातावरणात बाप्पाला दिंडीने नेऊन नगर परिषदेच्या वतीने बनवलेल्या कृत्रिम जलकुंडात विसर्जन करण्यात आले. या दिंडीदरम्यान आ.डॅा.मिलिंद नरोटे यांनी ठेका धरत नृत्य करून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला.
अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर गोपाळकाल्यासह भजन व महाप्रसादाचे आयोजन केले होते. आमदार डॉ.मिलिंद नरोटे व वैशाली नरोटे या दाम्पत्यासह भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गणेशाची पुजा केली. तसेच भाजपचे लोकसभा समन्वयक तथा महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणेचे संचालक प्रमोद पिपरे आणि माजी नगराध्यक्ष तथा भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष योगिता पिपरे यांनी गोपाळकाला आरती केली. यावेळी अनिल पोहनकर, अनिल तिडके, गीता हिंगे, अनिल करपे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.