गडचिरोली : कै.लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्या माध्यमातून आदिवासी व नक्षलप्रभावित भागातील शैक्षणिक कार्यासाठी कार्यरत एकलव्य एकल विद्यालयाच्या शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाचा समारोप सोहळा नागपुरातील महर्षी व्यास सभागृह, रेशीमबाग येथे उत्साहात झाला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आदिवासी विकासमंत्री प्रा.अशोक उईके, नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी, माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते, आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले, आ.संजय पुराम आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी म्हणाले, “नोबेल पुरस्कार मला मिळाला तो केवळ माझ्यासाठी नव्हे, तर भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आहे. जगातील 144 देशांत मी फिरलो. अनेक संघर्ष, अडचणी अनुभवल्या, पण समाजकार्याच्या वाटेवर कधीच थांबलो नाही. रवींद्रनाथ टागोर व सी.व्ही. रमण यांच्यानंतर मला हा सन्मान लाभला आणि मी हा गौरव सर्व भारतीयांचा आहे, असे मानून राष्ट्रपती भवनातच अर्पण केला, असे त्यांनी सांगताच उपस्थित शिक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
अध्यक्षीय मार्गदर्शनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, “कै.लक्ष्मणराव मानकर यांनी आयुष्यभर वंचित, दलित व शोषित घटकांसाठी निःस्वार्थी कार्य केले. त्यांनी भवभुती संस्थेपासून ते एकलव्य विद्यालयांपर्यंत आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी पायाभूत कार्य केले. आज शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. प्रत्येक व्यक्तीकडे काहीतरी विशेष गुण, काहीतरी हुनर असतो. शिक्षणाच्या माध्यमातून त्याचा विकास घडवून आणणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. सूर्य मावळला, चंद्र लुप्त झाला, तारे हरवले तरी दीप म्हणतो, माझे कार्य आहे उजेड देण्याचे, प्रकाश पसरवण्याचे. तसेच आपणही शिक्षण व संस्कारांच्या माध्यमातून अंधारात प्रकाश पसरवण्याचे कार्य अखंडपणे करत राहिले पाहिजे,’ ना.गडकरींच्या या प्रभावी भाषणाने उपस्थितांना शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीचे महत्व पटवून दिले.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अतुल शिरोडकर, माजी आमदार केशवराव मानकर, नागपूरच्या माजी महापौर माया इवनाते, रेखा मावस्कर, संजय भेंडे, संजय फांजे, उपाध्यक्ष राजीव हडप, मुरलीधर चांदेकर, सचिव प्रशांत चोपर्डीकर, कोषाध्यक्ष मिलिंद कानडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विरेंद्र अंजनकर यांनी केले.