गडचिरोली : लॉयड्स इन्फिनिट फाऊंडेशनचा भाग असलेल्या लॉयड्स स्पोर्ट्स अकादमी (एलएसए)च्या सदस्य खेळाडूंनी नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत गडचिरोली जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा उंचावले आहे. गोंदिया येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत एलएसए व्हॉलीबॉल संघाने चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकली. तसेच पुणे येथील राज्यस्तरीय अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 20 वर्षांखालील महिलांच्या उंच उडी स्पर्धेत प्रतिभावान खेळाडू मोनिका मडावी हिने रौप्यपदक जिंकले.
2 ते 5 सप्टेंबरदरम्यान पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत, लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीची प्रशिक्षणार्थी मोनिका मडावी हिने 20 वर्षांखालील महिलांच्या उंच उडी स्पर्धेत 1.40 मीटर उंच उडी मारून रौप्यपदकाला गवसणी घातली. या प्रतिष्ठित स्पर्धेत महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 2,100 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
आता मोनिका ही 18 ते 20 सप्टेंबरदरम्यान मध्य प्रदेशात होणाऱ्या पश्चिम विभागीय अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. पश्चिम विभागामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि गोवा येथील अव्वल खेळाडू सहभागी होतील. गडचिरोलीच्या युवा क्रीडा प्रतिभेला आता राष्ट्रीय स्तरावर चमक दाखविण्याची संधी यारूपाने मिळणार आहे. यासोबतच ही कामगिरी लॅायड्स स्पोर्टस् अकादमीची प्रतिष्ठा वाढविणार ठरली आहे.
रामनगर (गोंदिया) येथे झालेल्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत एलएसएच्या व्हॉलीबॉल संघाने अंतिम फेरीत 2-0 अशा फरकाने विजेतेपद पटकाविले. एकूण 16 संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.
“गडचिरोलीसारख्या ग्रामीण आणि आदिवासीबहुल प्रदेशातील क्रीडा प्रतिभेला वाव देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे हे प्रतिबिंब आहे. आमचे उद्दिष्ट अॅथलेटिक्सपासून ते सांघिक खेळांपर्यंत जागतिक दर्जाचे प्रशिक्षण आणि राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी तरुणांना संधी प्रदान करणे आहे,” अशी प्रतिक्रिया लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीच्या प्रवक्त्याने दिली.
एलएसए स्थानिक तरुणांना प्रेरित करीत सक्षमीकरणाच्या संधी उपलब्ध करून देत आहे, तसेच गडचिरोलीला महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख क्रीडा केंद्र म्हणून ओळख प्राप्त करून देत आहे.