सुसाट चालणाऱ्या वाहनांना न.प. क्षेत्रात लागणार ब्रेक

ट्राफिक पार्कबाबतही चाचपणी

गडचिरोली : नागरी वस्तीतून जाणाऱ्या वाहनांनी नियमांनुसार वेगमर्यादेत राहावे, यासाठी नगरपरिषद क्षेत्रात कमी वेगमर्यादा लागू करण्याची सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली. रस्ते सुरक्षा समितीची बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीत अपघात टाळण्यासाठी आणि अपघात झाल्यास ‘गोल्डन अवर’मध्ये तातडीने उपचार मिळण्याबाबत करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा झाली.

जिल्ह्यातील विशेषत: 2018 पूर्वीच्या जड वाहनांमध्ये बसविण्यात आलेल्या वेगमर्यादा चिप कार्यरत आहेत का, याचीही काटेकोर तपासणी करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता निता ठाकरे, अपर पोलीस अधीक्षक एम.रमेश, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग नागपूरचे उपअधीक्षक जयेश भांडेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके, नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर, सा.बां.विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पंडा यांनी अपघातग्रस्तांना गोल्डन अवरमध्ये उपचार मिळणे अत्यावश्यक असल्याचे सांगून रुग्णवाहिका तातडीने पोहोचण्याची व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यात 108 क्रमांकावर केवळ 10 रुग्णवाहिका उपलब्ध असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, 102 सेवेच्या आणखी 40 रुग्णवाहिका देखील अपघातस्थळी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक प्रणाली विकसित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमांची जाणीव विद्यार्थ्यांना लहान वयापासून व्हावी, यासाठी गडचिरोली येथे ट्राफिक पार्क उभारता येईल का, याची चाचपणी करून अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

‘ड्रंक अँड ड्राईव्ह’, राँग साईड, हेल्मेट, सिटबेल्ट आदी मोहिमांतर्गत करण्यात आलेल्या कारवाईचाही आढावा यावेळी घेण्यात आला. रस्त्यांवरील खड्यांबाबत सर्वाधिक तक्रारी राष्ट्रीय महामार्गांबाबत असल्याचे निदर्शनास आले असून याबाबत आवश्यक उपाययोजना राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग व पोलीस विभाग यांनी समन्वयाने काम करून रस्ता सुरक्षेच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. बैठकीस सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक जाधव, वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक शरद मेश्राम, तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.