12 जि.प.शिक्षकांना करणार गुणगौरव पुरस्काराने सन्मानित

उद्या नियोजन भवनात कार्यक्रम

गडचिरोली : नुकत्याच झालेल्या शिक्षक दिनानिमित्त (5 सप्टेंबर) दरवर्षी केल्या जाणाऱ्या शिक्षकांच्या गौरवाचा मुहूर्त अखेर उशिरा का होईना सापडला आहे. गुरूवार, दि.11 सप्टेंबर रोजी हा सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात होईल. त्यात जि.प.शाळांमध्ये विद्यादान करणाऱ्या प्रत्येक तालुक्यातील एका याप्रमाणे 12 शिक्षकांना गुणगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. त्यात 7 महिला शिक्षिका आणि 5 पुरूष शिक्षकांचा समावेश आहे.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे आयोजित या जिल्हास्तरीय शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2025 साठी ज्या 12 शिक्षकांची निवड करण्यात त्यात खालील शिक्षकांचा समावेश आहे.

वनश्री जाधव (जि.प.शाळा गोगाव, ता.गडचिरोली), प्रीती नवघडे (जि.प. शाळा कुनघाडा रै, ता.चामोर्शी), शितल कुमरे (जि.प. शाळा बिहीटेकला, ता.कोरची), बालाजी मुंडे (जि.प. शाळा बदबदा, ता.कुरखेडा), प्रवीण मुंजमकर (जि.प. शाळा बोळधा, ता.देसाईगंज), हेमलता आखाडे (जि.प. शाळा शिवणी बु., ता.आरमोरी, सिंपल मुधोळकर (जि.प. शाळा डुम्मे, ता.एटापल्ली), उज्वला बोगामी (जि.प. शाळा आरेवाडा, ता.भामरागड), मुरली गाइन (जि.प. शाळा विजयनगर, ता.मुलचेरा), सुरेखा मेश्राम (जि.प. शाळा शिवणीपाठ, ता.अहेरी), रमेश रच्चावार (जि.प. शाळा नगरम, ता.सिरोंचा) आणि विलास दरडे (जि.प. शाळा उदेगाव, ता.धानोरा) या शिक्षकांना गौरविले जाणार आहे.

पुरस्कार समारंभाचे औचित्य

शिक्षकांच्या गुणवत्तावर्धनाच्या कार्याची दखल घेत त्यांच्या योगदानाला गौरविण्याचा हा उपक्रम आहे. शिक्षण क्षेत्रातील कार्याला प्रेरणा मिळण्याचा हेतू यामागे आहे. नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी (योजना) नितीन बच्छाव, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वासुदेव भुसे व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाबासाहेब पवार यांनी केले आहे.