घोट भागातील समस्यांसाठी ‘मानवाधिकार’चे आंदोलन

काय केल्या मागण्या? वाचा

चामोर्शी : तालुक्यातील घोटजवळील नवेगाव येथे बुधवारी (दि.10) राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने जनआक्रोश आंदोलनात करत त्या भागातील अनेक समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनात भाजपचे पदाधिकारीही सहभागी झाले होते.

मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.प्रणय खुणे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात रस्त्यांचे नवीनीकरण करणे, घोट रेगडी भागातील 14 गावातील नागरिकांना सिंचनाकरिता पाण्याची सोय करणे, अतिक्रमित नागरिकांना जमिनीचे पट्टे देणे, घोट तालुक्याची निर्मिती, साखरदेव देवस्थानाला पर्यटनस्थळ म्हणून घोषित करणे, मुतनूर व कोठरी पर्यटनस्थळाचा विकास करणे, घोट भागातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी घोट भागात उद्योग उभारणी करणे, चामोर्शी-मूल मार्गाची तात्काळ दुरुस्ती करणे, पोहर नदीवरील पुजाजवळचा रस्ता दुरुस्त करणे, सुरजागड व कोनसरी येथील लॉयड्स मेटल्स कंपनीत स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना प्रथम प्राधान्य द्यावे, दिना धरणाची उंची वाढवणे व पाण्याची पातळी वाढवण्यासाठी धरणाचे खोलीकरण करणे, दारूबंदीची कडक अंमलबजावणी करणे, रस्त्यांची दुरूस्ती करून अनेक मार्गांवर बसफेऱ्या सुरू करणे आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले.

यावेळी भाजपचे जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, महिला आघाडीच्या प्रदेश सचिव रेखा डोळस यांनीही मार्गदर्शन केले. याशिवाय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.भारत खटी, प्रवक्ते ग्यानेंद्र विस्वास, अशोक पोरेड्डीवार, नामदेव सोनटक्के, अनिता रॉय, जाहेदा शेख, अनिता मडावी प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी यांनी, तर आभार जिल्हा उपाध्यक्ष अनुभव उपाध्ये यांनी मानले.