कळपासोबतच्या हत्तीने घेतला चुरचुऱ्यातील शेतकऱ्याचा बळी

कसा झाला हा घात, वाचा

गडचिरोली : धानाचे पीक बहरत असताना पुन्हा एकदा हत्तींच्या कळपाची नजर या पिकांवर पडत आहे. त्यामुळे शेतशिवारातील जंगलालगत आलेल्या हत्तींच्या कळपातील एका नर हत्तीने बुधवारी पोर्ला वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या चुरचुरा येथील एका शेतकऱ्याचा बळी घेतला. वामन मारोती गेडाम (68 वर्ष) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी संध्याकाळी घडली.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चुरचुरा या गावातील वामन मारोती गेडाम हे आपली गुरे घेऊन चुरचुरा उपक्षेत्रातील जंगलात गेले होते. त्यांच्यासोबत लहान भाऊ महादेव गेडाम आणि हिरोबी खोब्रागडे हेसुद्धा त्यांची गुरे घेऊन होते. त्या भागात हत्ती असल्याची माहिती वनविभागाच्या चमुने गावकऱ्यांना दिली होती. दरम्यान हत्तींचा कळप त्या भागातून जात असल्याचे दिसताच महादेव आणि हिरोबी हे सावध होऊन लांब निघून गेले. गेडाम हे सुद्धा परतीच्या मार्गावर असताना कळपातील हत्ती निघून जाईपर्यंत ते थांबले. मात्र कळपाच्या शेवटी काही अंतरावर एक नर आहे हे गेडाम यांच्या लक्षात आले नाही, आणि ते त्याच हत्तीच्या तावडीत सापडले.

दरम्यान पोर्ला वनपरिक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांना गस्तीदरम्यान गेडाम यांचा मृतदेह आढळला. हत्तीच्या हल्ल्यात गेडाम यांना मृत्यू झाल्याचे लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना माहिती दिली. तसेच दरम्यान गेडाम यांची ओळखही पटविण्यात आली. वडसा वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक रविंद्र सूर्यवंशी, पोर्लाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश पाचभाई, पोलीस कर्मचारी, आणि वनकर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान रात्रीच मृत गेडाम यांच्या कुटंबीयांना वनविभागाकडून तात्काळ आर्थिक आणि इतर मदत देप्यात आली.

वनविभागासह गावकरीही सतर्क

या घटनेनंतर वनविभागाने सभोवतालच्या गावांना आवश्यक ती खबरदारी घेण्याची सूचना केली. वनकर्मचाऱ्यांना त्या परिसरात आजुबाजूला फिरण्यास आाणि हत्तींच्या हालचालींबद्दल ग्रामस्थांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले. क्षेत्रीय कर्मचारी आणि आरआरटी टिम आधीच त्या परिसरात सक्रिय आहे. त्यांच्याकडून आजुबाजूला जंगली हत्तीची उपस्थिती, काय करावे आणि काय करू नये याबाबत गावामध्ये घ्यावयाच्या खबरदारीबाबत ग्रामस्थांना माहिती देण्यात आली. पुढील काही दिवस जंगलात प्रवेश करू नये यासाठी ग्रामस्थांना समजावून सांगण्यात आल्याचे पोर्लाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश पाचभाई यांनी कळविले.