गडचिरोली : आम आदमी पार्टीच्या नेतृत्वाखाली पेसा ग्रामसभा सक्षमीकरण करणाऱ्या मोबिलायझरांच्या संघटनात्मक बैठकीत विविध समस्या मांडण्यात आल्या. येथील प्रेस क्लब सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत अडचणींवर चर्चा करून त्यावर आंदोलन करण्यासाठी रणनिती ठरविण्यात आली.
या बैठकीला प्रदेश संघटनमंत्री भूषण ढाकुळकर, नागपूर महासचिव श्याम बोकळे, माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर भडांगे, जिल्हा अध्यक्ष नसीर हाशमी, उपाध्यक्ष राजू मडावी, सचिव अमृत मेहेर, संघटनमंत्री ताहीर शेख, सहसंघटन मंत्री चेतन गहाणे, सहसचिव संतोष कोडापे, कोषाध्यक्ष इरफान पठाण, युवा अध्यक्ष साहिल बोदेले, युवा उपाध्यक्ष राहुल मेश्राम, मीडिया प्रमुख राहील खतीब यांच्यासह कोरची, कुरखेडा, वडसा, आरमोरी, गडचिरोली, धानोरा, चामोरशी, मुलचेरा, अहेरी, भामरागड, सिरोंचा या तालुक्यांतील मोबिलायझर उपस्थित होते.
या बैठकीत पेसा क्षेत्रात काम करताना येणाऱ्या प्रशासकिय व सामाजिक अडचणी, शासकीय उदासीनता आणि मानधनाच्या अनियमिततेवर सविस्तर चर्चा झाली. प्रदेश संघटनमंत्री भूषण ढाकुळकर यांनी पक्षाकडून राज्यस्तरीय संघटन उभारणी व न्यायालयीन लढाईसाठी मोबिलायझरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले जाणार असल्याचे सांगितले. “मानधन, नियुक्ती व इतर प्रशासकीय अडचणी दूर करण्यासाठी दीर्घकालीन संघटनात्मक लढा आवश्यक आहे. यासाठी मानसिक तयारी करा,” असे त्यांनी सांगितले.
जिल्हा सचिव अमृत मेहेर यांनी आम आदमी पार्टी पेसा मोबिलायझरांबरोबर ठामपणे उभी असून, सर्व स्तरांवरून न्याय मिळवण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे स्पष्ट केले. जिल्हा अध्यक्ष नसीर हाशमी यांनी “संघटित लढ्याने धोरणात्मक उद्देश साध्य होतात. गडचिरोलीच्या दुर्गम भागात जीव मुठीत घेऊन काम करणाऱ्या मोबिलायझरांना नियमित मानधन देणे शासनाची जबाबदारी आहे. परंतु असंघटितपणामुळे शासन मनमानी करत आहे,” असे मत व्यक्त केले.
या सर्व मागण्यांसाठी राज्यस्तरावर पाठपुरावा करण्याची रणनिती ठरली. तालुका स्तरापासून मंत्रालयापर्यंत पहिल्या टप्प्यात निवेदनात्मक आंदोलन करण्याचा निर्णय सर्वानुमते झाला.