सर्व शाळा ‘स्मार्ट’ करण्यासाठी शासन कटिबद्ध- सहपालकमंत्री

शिक्षकांना गुणगौरव पुरस्कार प्रदान

गडचिरोली : “राज्य शासन जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचा दर्जा उंचावून त्यांना स्मार्ट शाळांमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करत आहे. खाजगी शाळेपेक्षा सरकारी अनुदानित शाळा अत्यंत दर्जेदार व्हाव्यात, विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नात शिक्षकांचे सहकार्य महत्त्वाचे असून त्यांच्या योगदानातूनच पुढची पिढी दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून घडेल,” असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी केले.

जिल्हास्तरीय शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2025 चे वितरण व सत्कार सोहळा गुरूवारी नियोजन भवनात संपन्न झाला. यावेळी दूरदृष्य प्रणालीद्वारे सहपालकमंत्री ॲड.जयस्वाल यांनी सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ.नामदेव किरसान, तर विशेष अतिथी म्हणून आमदार डॉ.मिलींद नरोटे, आमदार रामदास मसराम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, प्राचार्य बळीराम चौरे, कार्यकारी अभियंता विनोद उध्दरवार, जिल्हा कृषी अधिकारी किरण खोमणे, उपअभियंता नितीन पाटील आदी उपस्थित होते.

खा.डॉ.नामदेव किरसान यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनात शिक्षकांची भूमिका जिल्ह्याच्या शैक्षणिक उन्नतीसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण काम करून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन द्यावे, तसेच इतर शिक्षकांनाही प्रोत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी केले.

आ.डॉ. मिलींद नरोटे यांनी आर्टीफिशियल इंटेलिजन्सच्या युगात विद्यार्थ्यांना जागृत करणे व तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. आ.रामदास मसराम यांनी शाळांना भौतिक सुविधा आणि आधुनिक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असे सांगितले.
विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदांवर पोहोचताना पाहणे, हीच शिक्षकांची खरी कमाई असल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार म्हणाले.

पुरस्कारप्राप्त शिक्षक उज्वला बोगामी यांनी दुर्गम भागातील आव्हाने आणि त्यावर मात करत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला. प्राथमिक शिक्षक प्रविण मुंजुमकर यांनी आर्टीफिशियल इंटेलिजन्सच्या युगात विद्यार्थ्यांना आधुनिक माध्यमातून शिक्षण देण्याची गरज असल्याचे सांगितले.

हे आहेत पुरस्कारप्राप्त शिक्षक

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक अशा 12 शिक्षकांना व दोन केंद्रप्रमुखांना गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये बालाजी हनमंत मुंडे (कुरखेडा), वनश्री अंबादास जाधव (गडचिरोली), प्रिती नवघडे (चामोर्शी), शितल कुमरे (कोरची), प्रविण यादव मुंजुमकर (देसाईगंज), हेमलता आखाडे (आरमोरी), सिंपल मुधोळकर (एटापल्ली), उज्वला बोगामी (भामरागड), मुराली गाईन (मुलचेरा), सुरेखा मेश्राम (अहेरी), रमेश रच्चावार (सिरोंचा), विलास दरडे (धानोरा) यांचा समावेश आहे. तसेच गुरुदास गोमासे (केंद्रप्रमुख, चामोर्शी) व संध्या मोंढे (केंद्रप्रमुख, धानोरा) यांना गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाबासाहेब पवार यांनी केले. संचालन अमरसिंग गेडाम व धनंजय दुम्पेट्टीवार यांनी, तर उपस्थितांचे आभार विस्तार अधिकारी जितेंद्र साहाळा यांनी मानले.