देसाईगंज : तालुक्यातील सावंगी गावात माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या स्थानिक विकास निधीच्या साहाय्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गडचिरोली जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी (सन 2023-24) अंतर्गत नवीन वाचनालय इमारतीचे बांधकाम केले जाणार आहे. त्याचा भूमिपूजन सोहळा मा.आ. कृष्णा गजबे यांच्या प्रमुख उपस्थितीत सावंगीच्या सरपंच प्रभा ढोरे, उपसरपंच सुमंत मेश्राम तसेच ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते झाला.
याप्रसंगी सावंगी ग्रामपंचायत सभागृहात महाराष्ट्र शासनाच्या पंचायती राज विभागाच्या “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” अंतर्गत ग्रामस्तरीय कार्यशाळेचा शुभारंभ देखील मा.आ.गजबे यांच्या प्रमुख उपस्थिती करण्यात आला.
भूमिपूजन व ग्रामस्तरीय कार्यशाळा सोहळ्याला सरपंच प्रभा ढोरे, उपसरपंच सुमंत मेश्राम, ग्राम पंचायत सदस्य राजू कुरेशी, देवा बनसोड, रजनीकांत गुरनुले, मीरा पेलणे, नयना शहारे, सावंगी येथील आरोग्य अधिकारी डॉ.गहाणे, कृषी सहाय्यक टिचकुले, तलाठी जांभूळकर, माजी पंचायत समिती सभापती रेवता अलोने, माजी तं.मु.अध्यक्ष नर्देश डोंगरे, पोलीस पाटील सुधीर पेलणे, श्यामराव अलोने, भिवाजी पेलणे, सचिन गुरनुले, केशव लोखंडे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी आमदार गजबे यांच्या प्रयत्नांमुळे आणि त्यांच्या स्थानिक विकास निधीच्या मदतीने गावात वाचनालय बांधणीसाठी पावले उचलली गेली. यामुळे ग्रामस्थांना आधुनिक वाचनालय सुविधा उपलब्ध होतील. यातून शैक्षणिक विकासासह ज्ञानार्जन सुकर होणार आहे.
यावेळी मार्गदर्शन करताना गजबे म्हणाले की, ‘ज्ञानदीप जागृत करण्याचा हा एक मोठा उपक्रम आहे. या नव्या वाचनालयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाचनासाठी उत्तम सुविधा मिळतील आणि त्यांचा शैक्षणिक विकास होईल. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सुरु होणारी ग्रामस्तरीय कार्यशाळाही पंचायती राज संस्थांच्या सशक्तीकरणासाठी अत्यंत आवश्यक आहे. पंचायती राज हा गावातील लोकशाहीचा पाया आहे आणि त्याचे बळकटीकरण करताच स्थानिक विकास शक्य होईल.’