समृद्ध पंचायतराज अभियानाची गडचिरोली तालुका कार्यशाळा

'सर्वच ग्रा.पं.ने सहभाग घ्यावा'

मार्गदर्शन करताना बीडीओ अनिकेत पाटील, मंचावर अति.सीईओ राजेंद्र भुयार व इतर मान्यवर

गडचिरोली : ग्रामविकास विभागाच्या वतीने संपुर्ण राज्यामध्ये “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान” राबविल्या जात आहे. यामध्ये सर्वच ग्रामपंचायतच्या अधिकारी, सरपंच व सदस्यांनी समन्वय राखून गावाचा लोकसहभाग मिळवून विविध विकास कामे करावी. तसेच या अभियानात क्रमांक मिळवून लाखो रुपयांची बक्षीसे जिंकावी, असे आवाहन जि.प.चे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी केले. गडचिरोली तालुकास्तरिय कार्यशाळेत अध्यक्षीय मार्गदर्शनात त्यांनी हे आवाहन केले.

हे अभियान 17 ते 31 सप्टेंबर 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. यात ग्रामपंचायतींना कोट्यवधीची बक्षिसे दिली जातील. या अभियानात जास्तीत जास्त सहभाग वाढविण्यासाठी समाजकल्याण सभागृहात तालुकास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, तर विशेष अतिथी म्हणून समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन मडावी, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) तथा गटविकास अधिकारी अनिकेत पाटील, पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अमित साळवे, नायब तहसिलदार चंदु प्रधान, सहाय्यक गटविकास अधिकारी लिलाधर बेडके हे उपस्थित होते.

यावेळी आपल्या मार्गदर्शनात अनिकेत पाटील म्हणाले की, प्रत्येक गावात पायभुत सुविधा उपलब्ध करून द्याव्या, गावात उपलब्ध संसाधनांचा वापर करून ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच व सदस्य यांनी प्रशासनाची मदत घेऊन गावाच सर्वांगिण विकास साधावा. तसेच तिव्र ईच्छाशक्ती ठेवून इतर आदर्श ग्रामपंचायतींप्रमाणे गडचिरोली तालुक्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायत आदर्श करून प्रत्येक गाव सर्व सोयीसुविधायुक्त आणि समृध्द होईल याकरीता प्रयत्न करावे.

नायब तहसीलदार चंदु प्रधान यांनी पांदण रस्त्याच्या अडचणी व आतापर्यंत लोकसहभागातुन केलेली कामे, यावर विस्तृत मार्गदर्शन केले. प्रत्येक गावात शिवार फेरी काढून पांदण रस्त्यांना क्रमांक व नावे देण्यासाठी महुसल विभाग मदत करणार असे सांगितले. या अभियानासाठी विविध पातळींवर लाखो रुपयांची बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.