गडचिरोली : भारत सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या माध्यमातून ‘भारत कृत्रिम अंग निर्माण निगम’ (एलिम्को) मुंबई यांच्या सहकार्याने आणि पोलिसांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रकारची सहायक उपकरणे दिली जाणार आहेत. त्याची नोंदणी करण्यासाठी गडचिरोली आणि अहेरी येथे दोन दिवसीय शिबिर घेण्यात आले. त्यात दुर्गम भागातील एकूण 1300 ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी करण्यात आली. याशिवाय 207 ज्येष्ठ नागरिकांना विविध शासकिय योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला.
गडचिरोली पोलीस दलाकडून जिल्ह्रातील नागरिकांसाठी विविध कल्याणकारी उपक्रम राबविले जात असतात. शासनाच्या या कल्याणकारी योजनांचा लाभ येथील गरजु आदिवासी नागरिकांना मिळावा यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव प्रयत्नशिल असते. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य सुरक्षित, जीवनमान अधिक सुलभ व गुणवत्तापूर्ण करण्यासाठी, तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्यक्षात पोहचविणे, गरजू ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक वैद्यकीय सहाय्य उपलब्ध करुन देणे आणि त्यांचे जीवनमान सुसह्य व्हावे या उदात्त हेतूने हे शिबिर घेण्यात आले. यात पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली, गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकी, “प्रोजेक्ट उडान” अंतर्गत भारत सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या माध्यमातून एलिम्को, मुंबई यांच्या सहकार्याने पोलीस मुख्यालयातील एकलव्य सभागृहात आणि दुसऱ्या दिवशी पोलीस उप-मुख्यालय प्राणहिता (अहेरी) येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी सहायक उपकरणे तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.
या शिबिरादरम्यान वैद्यकीय पथकाकडून ज्येष्ठ नागरिकांची वयोमानानुसार उद्भवणाऱ्या शारीरिक अडचणींकरीता तपासणी करण्यात आली. आवश्यकतेनुसार दैनंदिन कामकाज सुसह्य होण्यासाठी गरजेचे असलेल्या विविध उपकरणांचे त्यांना मोफत वाटप करण्यात येणार आहे. या शिबिरात उत्तर विभागातील 850 आणि दक्षिण विभागातील 450 अशा मिळून एकूण 1300 ज्येष्ठ नागरीकांची तपासणी करण्यात आली.
कोणते साहित्य मिळणार?
ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार व्हीलचेअर, चालण्याची काठी, वॉकर, श्रवणयंत्र, कुबड्या, कमरेचा पट्टा इ.अशा विविध सहायक उपकरणांचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. शिबिरादरम्यान एकूण 207 लाभार्थ्यांना व्हिएलईच्या मार्फत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, आयुष्यमान भारत कार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड इ. योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला.
सदर शिबिरादरम्यान पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) सत्य साई कार्तिक, उपविभागीय पोलीस अधिकारी (अहेरी) अजय कोकाटे, तसेच पोलीस रुग्णालय गडचिरोलीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॅा.सुनील मडावी, जिल्हा सामान्य रुग्नालय गडचिरोलीचे ऑडीओलॉजीस्ट डॉ.संदीप मोटघरे, एलिम्को मुंबईचे डॉ.संकेत डेरवणकर, ऑर्थोटिक्स अँड प्रोस्थेटिक्स हर्ष विश्वकर्मा, कॅम्प कॉर्डिनेटर विकास कुमार, हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व अंमलदार तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि.चंद्रकांत शेळके व पोलीस अंमलदारांनी परिश्रम घेतले.