एटापल्ली : तालुक्यातील अत्यंत खराब स्थितीत असलेल्या सुरजागड ते गट्टा (रस्ता क्र. 381) या मार्गाच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात झाली आहे. खड्डे बुजविण्याचे काम तात्काळ सुरू करण्यात आले आहे. या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी हे काम तातडीने सुरू करण्याची सूचना दिल्यानंतर त्याला गती आली.
सदर रस्ता दीर्घकाळापासून दयनीय अवस्थेत होता. प्रवाशांसोबतच गरोदर महिला, रुग्ण आणि विद्यार्थी यांच्यासाठी तो धोकादायक ठरत होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एटापल्ली तालुक्याच्या वतीने युवा नेते हर्षवर्धनबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात आलापल्ली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रव्वा यांना निवेदन सादर करण्यात आले होते. या निवेदनात रस्त्याची बिकट अवस्था स्पष्ट करत, तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर लगेच आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेत, सा.बां. विभागाला आवश्यक त्या सूचनाही दिल्या. परिणामी कालपासून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
डॉ.मिताली आत्राम यांनीही कामाची पाहणी करताना, फक्त खड्डे बुजवू नका, पक्के व टिकाऊ रस्ते तयार करा, अशी स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिली. त्यांच्यासोबत सा.बां.विभागाचे कनिष्ठ अभियंता लक्ष्मण नरोटे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय चारडुके, चेतन हिचामी, सूरज जाधव, तिरुपती मडावी, आकाश राऊत, सुनील नैताम उपस्थित होते.
या समस्येवर निवेदन देताना राकाँचे तालुकाध्यक्ष संभा हिचामी, माजी उपसभापती जनार्धन नल्लावार, गट्टा उपसरपंच महक लेखामी, जांबियाचे सरपंच चेतन हिचामी, राजू नरोटे, लक्ष्मण नरोटे, अजय पदा, दसरू मट्टामी, मुन्ना पुंगाटी, सदाशिव हिचामी, सत्तू दोरपेटी, दुलासा हेडो, उमेश हिचामी, महारू लेकामी, मिरवा लेकामी, सुधाकर पदा, कटिया गोटा, दिनेश लेकामी, निकेश गोटा, सुरेश उईके, साईनाथ वड्डे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.