अवघ्या तीन महिन्यात उखडला ‘पीएमजीएसवाय’चा रस्ता

'आझाद'ने उपस्थित केले प्रश्नचिन्ह

धानोरा : तालुक्यातील पेंढरीच्या पुढे दुर्गापूर ते सोमलपूरदरम्यान मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 4.400 किलोमीटर रस्त्याचे काम तीन महिन्यापूर्वी गुप्ता कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मार्फत करण्यात आले. परंतु या रस्त्याचे काम इतके बोगस व निकृष्ट दर्जाचे आहे की अवघ्या तीन महिन्यात रस्ता उखडला आहे. डांबर व इतर साहित्याचा वापर अत्यंत कमी केल्याने रस्त्याची दुर्दशा झाली, असा आरोप दुर्गापूर ग्रामवासियांसह आझाद समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

गावकऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिल्यानंतर आझाद पक्षाचे प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम, जिल्हा प्रभारी विनोद मडावी व जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी गावाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी सरपंच परमेश्वर गावडे हेसुद्धा उपस्थित होते. या रस्त्याचे काम निकृष्ट असल्याचे समजले. तसेच मार्गांवरील पलसगाव येथे सिमेंट रोड मंजूर असताना त्याचे कोणतेही काम झालेले नाही.

गुप्ता कँन्स्ट्रक्शन कंपनी व संबंधित अधिकाऱ्यांनी यामध्ये मोठा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप आझाद समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी केली आहे.