गडचिरोली : प्रा.संध्या शेषराव येलेकर यांच्या रांगोळी रंग, रेषा, चित्र सौंदर्य या कुंचल्याच्या स्ट्रोकातून निर्मित कलाकृती आणि या कलाकृतीवर प्रा.विनोद नवघडे यांच्या कविता आणि चारोळ्या यांच्या संतुलित मिश्रणातून तयार झालेली चित्रलिपी, तसेच संमिश्र हा आस्वादक लेखसंग्रह अशा दोन प्रतिष्ठित आणि अतिशय मेहनतीने तयार केलेल्या पुस्तकांचे विमोचन माझ्या हातून झाले, हे मी माझं परम भाग्य समजतो, असे भावनिक उद्गार ज्येष्ठ सहकार नेते तथा सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी व्यक्त केले. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आयोजित सदर पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्याचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी प्रा.अनिल धामोडे, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता प्रा.पुनीत मातकर, तसेच गोविंदराव मुनघाटे महाविद्यालय कुरखेडा येथील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर होते.
अरविंद सावकार पुढे म्हणाले, संध्या येलेकर यांना या पुस्तकांच्या निर्मितीसाठी अतिशय कष्ट घ्यावे लागले. ही दोन्ही पुस्तके समाज व्यवस्थेच्या उपभोगासाठी नक्कीच आहेत, त्याहीपेक्षा आपल्या जीवनात संस्कृती संवर्धनासाठी अधिक महत्वाची आहेत. कलाकारांसाठी जे काही चांगलं करायला पाहिजे ते काम प्रा.संध्या येलेकर आणि प्रा.विनोद नवघडे यांनी केले आहे. या सभागृहातील अप्रतिम अशा प्रकाशन सोहळ्यासाठी जमलेला हा मेळा अतिशय सुसंस्कृत, साहित्य, कला आणि कवीमनाची जाण असणारा आहे. प्रत्येकाने हे अतिशय सुंदर, देखणं पुस्तक आपल्या जीवनात जतन करून ठेवावे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
प्रा.अनिल धामोडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, संध्या येलेकर यांची लेखनाची सुरुवात देशोन्नतीच्या मनस्विनी या सदरातून झाली. वेगवेगळ्या विषयांवर लेखन करीत असतानाच त्यांनी काढलेल्या रांगोळ्या, पेंटिंगसुद्धा देशोन्नतीतून प्रकाशित झाल्या. आज त्यांनी उत्तम लेखिका, निवेदिका, संपादिका, वक्ता म्हणून आपला ठसा उमटविला आहे. सोबत त्यांच्यातील क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील गुणांमुळे अष्टपैलू व्यक्तिमत्व हा शब्द सुद्धा त्यांच्यापुढे फिका वाटतो, असे गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि पुस्तकावरील भाष्यकार प्रा.डॅा.नरेंद्र आरेकर यांनी ही दोन्ही पुस्तके वाचकांना नवीन दृष्टिकोन देणारी असल्याचे सांगितले. चित्रावर किंवा कलाकृतीवर आधारित कविता आणि त्यातून निर्मित चित्रलिपी हा अनोखा असा प्रयोग असल्याचे ते म्हणाले. संमिश्र या पुस्तकातील बहुतेक लेख हे उत्तम ललित गद्य आहेत, पण यातच संध्याताईंनी अडकून न पडता सामाजिक चळवळी, स्त्रियांचे प्रश्न, आदिवासी मुली आणि त्यांच्या प्रतिभा यावर अतिशय अभ्यासपूर्वक लेखन हे दिशादर्शक असल्याचे त्यांनी म्हटले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.विनोद नवघरे यांनी तर संचालन अरुणा गोहने यांनी केले. या कार्यक्रमाला दंडकारण्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॅा.राजाभाऊ मुनघाटे, श्री शिवाजी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल पाटील मशाखेत्री, सचिव गोविंदराव बानबले, ज्येष्ठ सदस्य दादाजी चापले, शरद ब्राह्मणवाडे, शालिग्राम विधाते, ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत, ज्येष्ठ नाटककार चुडाराम बल्लारपुरे, डॉ.सुरेश लडके, दादाजी चुधरी, पांडुरंग घोटेकर, प्रा.गौतम डांगे, कवी गजानन मादसवार, लेखक व कथाकार प्रमोद बोरसरे यांच्यासह साहित्य, कला, काव्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी प्रा.शेषराव येलेकर, राजेश गोहने, सतीश पवार, महेश बोरेवार, नितीन चेंबूलवार, वसंत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुचिता कामडी यांनी विशेष मेहनत घेतली.
मुनघाटे महाविद्यालयाच्या मृदगंध वार्षिकांकाचे विमोचन
दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोलीद्वारा संचालित स्थानिक श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाचा अतिशय प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या मृदगंध या वार्षिकांकाचे विमोचन सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावर्षीचा हा वार्षिकांक सहकार क्षेत्राला समर्पित आहे.
या कार्यक्रमाला दंडकारण्य संस्थेचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे, मुख्य संपादक डॉ.रवींद्र विखार, संपादक मंडळाचे सदस्य डॉ.नरेंद्र आरेकर, डॉ.भास्कर तुपटे, डॉ.गुणवंत वडपल्लीवार, डॉ.संजय महाजन, योगिता खंडाईत आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी अरविंद सावकार म्हणाले, सहकारावर आधारित मृदगंध हा वार्षिकांक अतिशय दर्जेदार असून त्याचे मुखपृष्ठ, चित्रे, अक्षराचा आकार, शब्दांची मांडणी, बांधणी, महाविद्यालयाची गौरवमुद्रा, इत्यादी वाखाण्याजोगी आहेत. उत्तम व दर्जेदार वार्षिकांकाची निर्मिती केल्याबद्दल प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे व संपूर्ण संपादक मंडळाचे त्यांनी अभिनंदन करत भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्राचार्य डॉ.मुनघाटे म्हणाले, 2025 हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघाने सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे ‘सहकार’ हा मुख्य विषय घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या दर्जेदार लेखणीतून मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत लेख, कविता, चुटकुले लिहून आपल्या अंगी असणाऱ्या लेखन कौशल्याला अभिव्यक्त केले आहे.
महाविद्यालयाच्या मृदगंध वार्षिक अंकाला सलग पाच वर्षांपासून गोंडवाना विद्यापीठाकडून प्रथम पुरस्काराने सन्मानित केले जात आहे. अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या राज्यस्तरावरील प्रथम पारितोषकासाठी मृदुगंध या वार्षिक अंकाची निवड झालेली होती.
कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर यांनी, तर आभार डॉ.रवींद्र विखार यांनी मानले.