
गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ‘बेरोजगार दिन’ म्हणून पाळत युवक काँग्रेसच्या वतीने गडचिरोलीच्या इंदिरा गांधी चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी काही सुशिक्षित बेरोजगारांनी चौकात पकोडे तळून केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध केला.

युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अॅड.विश्वजित कोवासे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत चौकात जमून हे निषेध आंदोलन केले. याबद्दल सांगताना अॅड.कोवासे म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी गेल्या 10 वर्षात बेरोजगारांना दिलेली आश्वासने पाळली नाही. वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले पण रोजगार देण्याऐवजी बेरोजगारी वाढवली. नोकऱ्या मिळत नसल्याने पकोडे तळून स्वयंरोजगार करण्याचा सल्ला मोदींनी युवकांना दिला आहे. त्यामुळे बेरोजगार युवकांनी पकोड्याचे दुकान थाटले असून मोदींचा वाढदिवस आम्ही बेरोजगार दिन म्हणून साजरा करत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड यांच्या नेतृत्वात अनेक कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.
































