जिल्ह्यातील विकास कामांसाठी उपमुख्यमंत्री अजितदादांना साकडे

राकाँच्या शिष्टमंडळाचे निवेदन

गडचिरोली : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांची गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या शिष्टमंडळाने मुंबईत भेट घेतली. यावेळी जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, प्रदेश उपाध्यक्ष नाना नाकाडे, प्रदेश सरचिटणीस युनूस शेख यांनी दादांना गडचिरोली जिल्ह्यातील विविध विकास कामांसंबंधाने निवेदन केले.

या निवेदनात प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्यातील शेतीला बारमाही सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी वैनगंगा नदीवर असलेल्या गोसेुखुर्द धरणाचा डावा कालवा निर्माण करून पाणी देण्यात यावे, ग्रामरोजगार सेवकांना 3 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयानुसार मानधन देण्यात यावे, देऊळगाव बॅरेजला मंजुरी प्रदान करण्यात यावी़, तुलतुली, कारवाफा धरणाच्या कामाला पुन्हा मंजुरी देऊन त्याची सुरवात करण्यात यावी, वडसा येथे नाट्य सभागृहासाठी निधी उपलब्ध करण्यात यावा, अशा विविध मागण्यांचा समावेश होता.

त्यावर उपमुख्यमंत्री अजितदादांनी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना फोन करून गडचिरोली जिल्ह्यात बारमाही सिंचनाच्या सुविधा निर्माण करण्याबाबत चर्चा केली. गडचिरोली जिल्ह्याच्या कोणत्याच कामाला पैसे कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. दादांचा हा वादा गडचिरोली जिल्हाच्या विकासाला गतिमान करेल, अशी आशा राष्ट्रावादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी व्यक्त केली.