गडचिरोली : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या जिल्ह्यातील रखडलेल्या आणि संथगतीने सुरू असलेल्या कामांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात कानउघाडणी करण्यासाठी आमदार डॅा.मिलिंद नरोटे यांनी गुरूवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यालय गाठले असता कोणतेच जबाबदारी अधिकारी आणि कर्मचारी जागेवर नव्हते. कोण कुठे गेले याची माहितीसुद्धा कार्यालयात नव्हती. हा प्रकार गंभीर असून आठवडाभरात या कार्यालयाने काम सुधारले नाही आणि संथगतीने सुरू असलेल्या कामांना गती दिली नाही, तर अधिकाऱ्यांविरोधात पोलीस तक्रार करण्याचा इशारा आ.डॅा.नरोटे यांनी दिला.

राष्ट्रीय महामार्गाचे धानोरा मार्गासह चामोर्शी मार्गावरील काम अनेक दिवसांपासून अर्धवट स्थितीत आहे. हे काम लवकर पूर्ण करण्याची सूचना डॅा.नरोटे यांनी महामार्ग प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्यांना दिली होती. त्यांनी काम विनाविलंब पूर्ण करण्याचे आश्वासनही दिले होते. पण गुरूवारच्या रात्री चामोर्शी महामार्गावर एक ट्रक उलटल्याने जवळपास 12 तास वाहतूक ठप्प झाली होती. अशाच पद्धतीची स्थिती धानोरा मार्गावरही दोन दिवसांपूर्वी झाली होती. त्यामुळे काल (गुरूवारी) आ.नरोटे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी महामार्ग प्राधिकरणचे कार्यालय गाठले. मात्र कार्यकारी अभियंता किंवा कोणीही जबाबदारी अधिकारी-कर्मचारी हजर नव्हते. त्यामुळे आ.नरोटे यांनी तडक पोलीस स्टेशन गाठले. पण त्याचवेळी कार्यकारी अभियंत्यांनी फोन करून डॅा.नरोटे यांच्याशी संवाद साधत आठवडाभरात रस्त्याची समस्या दूर करण्याची हमी दिली. त्यामुळे एफआयआर दाखल न करता डॅा.नरोटे यांनी त्यांनी एक संधी दिली.
येत्या आठवडाभरात ही समस्या दूर केली नाही तर पोलिसात तक्रार दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आ.डॅा.मिलिंद नरोटे यांनी दिला. सरकार चांगली कामे करत आहे, पण त्याला प्रशासनातील अधिकारी योग्य ती साथ देत नसतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया डॅा.मिलिंद नरोटे यांनी दिली.

































